Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली : धारदार शस्त्राने वार करून वृद्धेचा खून

सांगली : धारदार शस्त्राने वार करून वृद्धेचा खून
 

टुंबातील वादाला कारणीभूत असल्याच्या संशयावरून युवकाने धारदार शस्त्राने (एडका) हल्ला करून वृद्धेचा खून केला. ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास कुंभार मळा परिसरात घडली.

आक्काताई नागाप्पा उमरे (वय 70, रा. कुंभार मळा, सतरावी गल्ली, सांगली) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संशयित हल्लेखोर रोहित सतीश लठ्ठे (वय 30, रा. कुंभार मळा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून धारदार शस्त्र हस्तगत केले आहे.

याबाबत मल्लिकार्जुन नागाप्पा उमरे (रा. समतानगर, मिरज) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी मल्लिकार्जुन हा आक्काताई यांचा मुलगा. तो वाहनचालक आहे. तो कुटुंबासह मिरजेतील समतानगरमध्ये राहतो. त्याची आई आक्काताई कुंभार मळ्यात भाड्याच्या घरात राहत होती. त्यांच्याशेजारी जवळच हल्लेखोर रोहित राहतो.

आक्काताई आणि रोहित यांच्यात काही महिन्यांपासून वाद होता. ती आमच्या कुटुंबात भांडणे लावते, तिच्यामुळे घरात वाद होत आहेत, तिला येथून घेऊन जा, नाही तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही रोहितने मल्लिकार्जुन यांचा भाचा विजय पाटील याला दिली होती.

बुधवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास आक्काताई आणि रोहित यांच्यात वाद झाला. त्यातून त्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. कपाळ, तोंड आणि हातावर वर्मी घाव बसल्याने रक्तस्राव होऊन त्या खाली कोसळल्या. त्यांना नागरिकांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रोहितवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याला सायंकाळी ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.