शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर उपस्थित नसणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार; मंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सातकुंडजवळ ऊसाने भरलेली मालमोटार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात तातडीने उपचार मिळाले नाहीत. या प्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई
करण्याचे निर्देश सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. याबाबत आरोग्य
मंत्र्यांना विनंती करण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
यांनी विधान परिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम
93 अन्वये याबाबतची सूचना मांडली होती. त्यावर शासनाने या प्रकरणाची
गांभीर्याने दखल घेतल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी
सांगितले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, 10 मार्च रोजी घडलेल्या या घटनेत सहा व्यक्तींचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले. तीन व्यक्तींना उपचार करुन सोडण्यात आले. शासनामार्फत मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत देण्यात आली. जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेत अपघात झाल्यानंतर तातडीने उपचार मिळाले नसल्याचे मृत व्यक्तींचे नातेवाईक आणि जखमींनी नमूद केले आहे. विरोधी पक्षनेते यांनी निदर्शनास आणल्याप्रमाणे शासकीय रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसणे अशा बाबी आढळून आल्या आहेत. यामुळे या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असल्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.