Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात हिंसक दंगल; जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमुळे वातावरण तापले

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात हिंसक दंगल; जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमुळे वातावरण तापले
 

सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून  राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याआधी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली, परंतु हे प्रकरण शांत झाले होते. मात्र सोमवारी दुपारी नागपूरमध्ये  पसरलेल्या एका अफवेतून निघालेल्या ठिणगीचे रूपांतर संध्याकाळपर्यंत हिंसक दंगलीत झाले. या दंगलींनी नागपूरच्या अनेक भागात थैमान घातले आहे. त्यानंतर पोलीस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष झाला, ज्यात अनेकजण जखमी झाले, तर 40 वाहने जाळण्यात आली. औरंगजेब कबरीच्या वादावरून सोमवारी रात्री 8.30 वाजता नागपूरमधील महाल परिसरात दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाचा पुतळा जाळला होता, त्यानंतर हिंसाचार उसळला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, निदर्शकांनी पुतळ्यासह एक धार्मिक पुस्तक जाळल्याच्या अफवा पसरल्या. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये दगडफेक झाली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोठ्या संख्येने गाड्यांची तोडफोड करण्यात आली. जमावाने समोरून येणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली. दोन जेसीबी पेटवून देण्यात आले. गोंधळ घालणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाले आहेत, तर पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर सिंगल म्हणाले की, परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

काही लोकांनी अफवा पसरवली की अरबी भाषेत लिहिलेले काही शब्द जाळले गेले आहेत. यानंतर गोंधळ आणखी वाढला. ही अफवा पसरताच हजारो लोक एकत्र आले आणि त्यांनी मोठा गोंधळ उडवला. पोलिसांच्या मते, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, आम्ही सतत पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहोत. नागपूर हे एक शांत शहर आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलीस परिस्थिती हाताळत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा हल्ला नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता. पोलीस पथकावर दगडफेक करण्यात आली आहे.

हे कृत्य करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. औरंगजेब हा देशाचा शत्रू आहे. त्याच्या समर्थकांवर कडक कारवाई केली जाईल. नागपूरचे डीसीपी अर्चित चांडक म्हणाले, ही घटना गैरसमजामुळे घडली. परिस्थिती नियंत्रणात आहे. दुसरीकडे, खबरदारीचा उपाय म्हणून, छत्रपती संभाजी नगर येथील औरंगजेबाच्या थडग्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पुस्तक जाळल्याचे आरोप फेटाळून लावले आहे, निदर्शनाचा भाग म्हणून फक्त औरंगजेबाचा पुतळा जळाल्याचे त्यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.