अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहात सगळ्यांनाच झोडपून काढले. त्यांच्या फटकारातून आज कोणीही सुटलं नाही. जयंतराव पाटील यांच्यापासून भास्कर जाधव आणि विजय वडेट्टीवार यांच्यापासून अमित देशमुख अन् डॉ. विश्वजित कदम यांच्यापर्यंत अजितदादांनी सर्वांवर जोरदार फटकेबाजी केली.
'भारती विद्यापीठाचं पतंगरावांनी सगळं करून ठेवलंय... त्यामुळे तू नुसतं ऐकतोय... तू काय केलंय? तू ते नुसतं टिकवं म्हणजे झालं' असा टोला अजित पवारांनी विश्वजित कदमांना लगावला. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार हे जयंत पाटील यांनी वाढत्या कर्जाच्या संदर्भात आपल्या भाषणात भाष्य केलं होतं. त्याला उत्तर देताना अजितदादांनी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि विश्वजित कदम यांनाही टोला लगावला. त्या वेळी विश्वजित कदम आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.
राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत आपण दहा लाख 80 हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज काढू शकतो. पण, आपण नऊ लाख कोटी कर्ज काढलंय. म्हणजे जयंतराव तुमच्यापेक्षाही चांगलं आहे, म्हणत अजित पवारांनी विधानसभेत एक कागद दाखवला. जयंतराव पाटील तुम्हाला हेही देतो आणि बाकीचंही बोलतो. जयंत पाटील यांना उद्देशून बोलत असतानाच अजित पवारांची गाडी अमित देशमुख आणि विश्वजित कदम यांच्याकडे वळाली. अमित देशमुखसाहेब, कदमसाहेब, तुम्ही दोन फार हुशार माणसं या सभागृहात आहात....काँग्रेस पक्षाचे सन्मानीय सदस्य, असा टोमणा लगावून अजित पवार पुढे बोलू लागले, तेवढ्यात समोरच्या बाकावर बसलेले आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, 'आम्ही ऐकतोय, शिकतोय' अशी कमेंट केली. त्यानंतर मग अजित पवारांची गाडी सुसाट सुटली.नाही, तू ऐकतोय... पण, भारती विद्यापीठाचं पतंगरावांनी सगळं करून ठेवलंय... त्यामुळे तू नुसतं ऐकतोय.... तू काय केलंय? तू ते (भारती विद्यापीठाचा कारभार) नुसतं टिकवं म्हणजे झालं. ते टिकविण्यासाठी जयंतरावांचा सल्ला घे, कुठं काय कमी झालं तर... असा सल्ला देत असतानाच विश्वजित कदमांनी भारती विद्यापीठाचं कार्यक्षेत्र मी वाढवतोय, असं सांगितलं. त्यावर अजितदादांनी ते वाढवलेलं अजून मला दाखवलं नाही, असा टोमणा लगावला. दरम्यान, पुढे जाण्यासाठी कर्ज काढावंच लागते. कमी व्याजाने कर्ज मिळत असेल तर ते घेऊन काम केलंच पाहिजे, असे सांगून अजित पवारांनी राज्यावर वाढलेल्या कर्जाचं समर्थन केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.