मटणावर ताव मारताना हाड अन्ननलिकेत अडकलं, श्वास घ्यायला अन् पाणी प्यायला त्रास, आजोबांसोबत घडलं ते भयंकर
मटणावर ताव मारत असताना चुकून हाड गिळलं. हे हाड अन्ननलिकेत अडकून अन्ननलिकेला छिद्र पडलं. इंदापूरमधील आजोबांसोबत हा भयंकर प्रकार घडला. त्यांना श्वास घ्यायला अन् पाणी प्यायला देखील प्रचंड त्रास होत होता. डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे हे हाड बाहेर काढले. पुण्यातल्या ससून
रुग्णालयात ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली. सध्या या घटनेची सगळीकडे
चर्चा होत आहे. इंदापूरमधील ७० वर्षीय आजोबा विवाह सोहळ्यासाठी गेले होते.
या लग्नामध्ये आजोबांनी मांसाहार केला.
पण जेवण करताना चुकून त्यांनी हाडही गिळले. हे हाड आजोबांच्या अन्ननलिकेत आडवे होऊन अडकले. या हाडामुळे आजोबांच्या अन्ननलिकेत छिद्र झाले. त्यामुळे आजोबांना पाणी देखील पिता येत नव्हते आणि श्वासही घ्यायला त्रास होत होता. ससून रुग्णालयातील शल्यक्रिया तज्ज्ञांच्या पथकाने 'एंडोस्कोपी'द्वारे यशस्वीपणे हाड बाहेर काढून त्यांना जीवनदान दिले. तसेच अन्ननलिकेचे छिद्र बुजविण्यासाठी स्टेंटही टाकला.
२४ फेब्रुवारी रोजी इंदापूरमध्ये एका विवाह सोहळ्यात जेवताना आजोबांनी चुकून हाड गिळले होते. त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. आजोबांना पाणी पिता येत नव्हते तसंच श्वास घेता येत नव्हता. त्याची प्रकृती जास्तच बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस त्यांच्यावर इंदापूरमध्ये उपचार सुरू होते पण काहीच उपयोग झाला नाही. आजोबांचा त्रास काही कमी झाला नाही. शेवटी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ससून रुग्णालयात डॉक्टरांनी सीटी स्कॅनद्वारे हाडाची अचूक स्थिती शोधून काढली. हाडाचे आकारमान ५.३ बाय ३ सेमी होते आणि ते आडवे अडकले होते. रुग्णाचे वय लक्षात घेता शस्त्रक्रिया करणे धोकादायक ठरले असते म्हणून एंडोस्कोपीद्वारे हाड काढण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. ही शस्त्रक्रिया २७ फेब्रुवारी रोजी शल्यक्रिया तज्ज्ञ विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पद्मसेन रनबागळे यांच्या नेतृत्वाखाली कान नाक घसा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल ठाकूर, भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. नेहा कांबळे, डॉ. सुजित क्षीरसागर यांच्या टीमने केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आजोबांना जीवनदान मिळाले. आता आजोबांची प्रकृती चांगली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.