नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीचा मुख्य सूत्रधार फहीम खानच्या घरावर नागपूर महापालिकेने बुलडोजर चालवून त्याची दोन मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दंगलीतील आरोपींना सोडणार नाही आणि यामुळे झालेली नुकसान भरपाई त्यांच्याकडूनच वसूल करण्यात येईल, असा इशारा दिला होता.
फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्यानंतर तातडीने महापालिका आणि पोलिस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. यापूर्वी नागपूरचा कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचेही घर महापालिकेने पाडून त्याची दहशत संपवली होती. मागच्या शनिवारी (ता. 17) विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलकांना प्रत्युत्तर देण्यासाठी हजार लोकांचा जमाव धावून आला होता. त्यांनी तुफान दगडफेक केली. लोकांच्या गाड्या जाळल्या. रस्त्यावर जाळपोळ केली. या घटनेत पोलिससुद्धा जखमी झाले होते. त्यामुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने काही वस्त्यांमध्ये संचारबंदी लागू केली होती. पोलिस बंदोबस्त वाढण्यात आला होता.
मात्र रात्री बारा वाजताच्या सुमारास पुन्हा समाजकंटकांनी डोके वर काढले.
हंसापुरी भागात पुन्हा गोंधळ घातला. पोलिसांवर दगडफेक केली होती. या
प्रकरणारी पोलिसांनी सुमारे बाराशे लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मुख्य
आरोपी फहीम खान आणि एकूण सहा जणांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
संपूर्ण घटनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी शहरात आले होते. त्यांनी पोलिसांसोबत बैठक घेतली. त्यांतर त्यांनी असे प्रकार खपवून घेणार नाही. दंगल, दगडफेक करणाऱ्यांकडून झालेली नुकसान भरपाई वसूल केली जाईल असे जाहीर केले होते. त्याच दिवशी महापालिकेने फहीम खानला अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावली होती. फहीम खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या कुटुंबीयाला बुलडोजर चालण्याची कल्पना आधीच आली होती.त्यानुसार त्यांनी रविवारी इमारतीतील सर्व साहित्य हलवले होते. पोलिस आणि महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक फहीन खानच्या उत्तर नागपूरमधील संजय बाग कॉलनीत दाखल झाले तेव्हा त्याचे घर संपूर्ण रिकामे होते. फहीम खानाने 869 चौरस मीटरवर अनधिकृत बांधकाम केले होते. बुलडोजने त्याची इमारत पाडण्यात आली आहे. आता या प्रकरणात आणखी पाच जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या मालमत्तेवर प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.