खासगी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन रचला पथकाने सापळा; मत्स्य व्यवसायच्या सहायक आयुक्तांना लाच घेताना पकडले
अहिल्यानगर: राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) विभागाचे सहायक आयुक्त रमेशकुमार जगन्नाथ धडील (मूळ रा. ॲक्वा लाईन रेसिडेन्सी, नाशिक रस्ता, नाशिक) यांना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. विशेष म्हणजे रमेशकुमार धडील हे एका
खाजगी कार्यक्रमासाठी राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे गेले होते, या
कार्यक्रमात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून धडील यांना
लाच घेताना पकडले.
त्यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकार प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना राबवते. या योजनेत भूजलाशीन पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर केले जातात. तक्रारदाराला त्याची पत्नी व बहिणीच्या नावाने हा प्रकल्प मंजूर झाला होता. शासनाच्या अटी व शर्ती प्रमाणे प्रकल्पाचे काम पूर्ण झाले होते. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेल्या प्रकल्पासाठी आत्तापर्यंत ३ लाख ८८ हजार ८०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले तर तक्रारदाराच्या बहिणीच्या नावे असलेल्या प्रकल्पास शासनाकडून २९ लाख १६ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते.
दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे. हे उर्वरित अनुदान मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यासाठी सहाय्यक आयुक्त रमेशकुमार धडीम (प्रथम वर्ग) यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.पडताळणी वेळी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. या लाचेचा पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रमेशकुमार धडील याला पथकाने रंगेहात पकडले. धडील हा मूळचा नाशिकमधील रहिवासी आहे. तेथील त्याच्या घराची झडती घेण्यात आली. अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपूटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चंद्रकांत काळे, विजय गंगुल, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांच्या पथकास पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, अंमलदार उमेश गोरे, गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, हरूण शेख यांनी सहाय केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.