अखेर अपहरण झालेले ७२ तास वयाचे बाळ ४८ तासांनी आईच्या कुशीत विसावले
सांगली : मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयातून ७२ तास वयाच्या तीन दिवसाच्या बाळाची चोरी करणार्या महिलेला पोलीसांनी सिध्देवाडी (ता. तासगाव) येथून सोमवारी रात्री मुलासह ताब्यात घेतले.
तब्बल ४८ तासानी सोमवारी रात्री उशिरा बाळ सुरक्षितपणे आईच्या कुशीत विसावले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यायाच्या रूग्णालयातून प्रसुतीपश्चात कक्ष क्रमांक ६४ येथून शनिवार दि. ३ मे रोजी सकाळी १२ वाजणेच्या सुमारास महिलेने कविता अलदार (रा. कोळे, ता. सांगोला) या महिलेच्या तीन दिवसाच्या बाळाची चोरी झाली होती. अपहरण करणार्या महिलेने बाळाला औषधाचा डोस देउन आणते असे सांगत प्लास्टिकच्या पिशवीतून बाळाची चोरी केली होती.
या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेले दोन दिवस बाळ आणि चोरी करणार्या महिलेचा शोध पोलीसाकडून युध्दपातळीवर घेण्यात येत होता. अखेर तांत्रिक माहितीच्या आधारे आणि रूग्णालयातील चलचित्राद्वारे मिळालेल्या छायाचित्राच्या आधारे पोलीसांनी संशयित महिेला सारा सायबा साठे (वय २४, रा. सावळज, ता. तासगाव) हिला पोलीसांनी ताब्यात घेतले. तिने अपहरण केलेले बाळ अतिरिक्त पोलीस अधिक्षक रितू खोकर यांनी मातेच्या स्वाधीन केले.
दरम्यान बाळाची चोरी झाल्याच्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे संस्थास्तरावर वरिष्ठ अध्यापकांची चौकशी समिती स्थापन केली असून त्यांना त्वरीत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे अधिष्ठात डॉ. प्रकाश गुरव यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.