सांगली : गारपीर चौक ते शंभरफुटी रस्ता येथील ड्रेनेजचे काम सहा महिन्यांनी पूर्णत्वाला आले असले, तरी मुरूम टाकण्याआधीच वाहतूक सुरू झाल्याने रस्ता चिखलमय बनला आहे. मोठी अवजड वाहने रुतून बसत आहेत. त्यांना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढावे लागत आहे. नागरिक, रुग्ण, वाहनधारकांचे हाल सुरू आहेत. या रस्त्यावर तातडीने मुरूम टाकण्याची गरज आहे.
गारपीर चौक ते शंभरफुटीपर्यंतच्या रस्त्याखाली जुनी ड्रेनेज लाईन होती. ती जीर्ण झाल्याने रस्त्यावर तीन ठिकाणी भगदाड पडले होते. त्यामुळे ही ड्रेनेज लाईन बदलणे आवश्यक होते. नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. खरे तर हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. परिसरात दहा ते बारा रुग्णालये आहेत. त्यामुळे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून घेणे गरजेचे होते. मात्र त्यास तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागला. आता ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र रस्त्यावर माती तशीच होती. ड्रेनेजसाठी पाडलेली भली मोठी चरही केवळ मातीने भरून घेतली होती. चरीत मुरूम टाकून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करणे आवश्यक होते.मात्र कामचलावूपणामुळे हा रस्ता आता पावसाने चिखलमय झाला आहे. त्यातूनच दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने जात आहेत. काही वाहने चिखलात रुतून बसत आहेत. क्रेनच्या साहाय्याने ती बाजूला करावी लागत आहेत. आता कडक ऊन पडल्यानंतरच या रस्त्यावरील माती काढून मुरूमीकरण करता येणार आहे. दरम्यान, काल सोमवारी दुपारीही जोराचा पाऊस झाला. त्यामुळे रस्ता अधिकच चिखलमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर मुरूम कधी पडणार आणि रस्ता वाहतुकीस पूर्ववत कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिव्हिल हॉस्पिटलसमोरील रस्त्याची अवस्थाही बिकट झाली आहे. मोठे खड्डे पडले आहेत. गारपीर चौक ते शंभरफुटी रस्ताही ड्रेनेज लाईनसाठी खोदल्याने त्याची दुर्दशा झाली आहे. सिव्हिल हॉस्पिटल चौक ते शंभरफुटीला जोडणार्या रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.