विटा ते तासगाव रस्त्यावरील मायाक्कानगर येथे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. अभिषेक अविनाश काशीकर (वय १९ रा. शितोळे गल्ली, विटा) असे अटक करण्यात
आलेल्याचे नाव आहे. अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे
यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक तयार केले होते. पथक विटा
शहरात गस्त घालत होते. यावेळी पथकाला माहिती मिळाली कि, तासगाव रोडवरील
मायाक्कानगर येथे शितोळे पिस्तूल घेऊन फिरत आहे.
मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत राउंड मिळाला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ कोणताही परवाना नसल्याची माहिती मिळाली. यावेळी त्याला ताब्यात घेऊन पिस्टलसह २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, उदय साळुंखे, संजय पाटील, संदीप पाटील, अमोल लोहार, शिवाजी शिद, सोमनाथ गुंडे, प्रमोद साखरपे, अभिजित ठाणेकर आणि सुनील जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.