Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदारांना 50 कोटींसह फ्लॅट अन् फॉर्च्यूनर..; राजकीय 'क्रांती' होणार, केंद्रीय मंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

आमदारांना 50 कोटींसह फ्लॅट अन् फॉर्च्यूनर..; राजकीय 'क्रांती' होणार, केंद्रीय मंत्र्यांच्या दाव्याने खळबळ


मागील काही महिन्यांपासून कर्नाटक काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या खुर्ची धोक्यात असल्याची जोरदार चर्चा आहे. उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या विश्वासू आमदारांकडून त्यासाठी फिल्डींग लावली जात आहे. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी काही आमदारांनी दिल्लीवारीही केल्याचे सांगितले जात आहे. त्यातच काही नेत्यांच्या विधानांमुळे वादळ उठले आहे.

कर्नाटकातील राजकीय स्थिती अस्थिर बनत चालल्याचा दावा भाजप व जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षांनी केला आहे. त्यातच भाजपचे नेते नारायणस्वामी यांनी धक्कादायक दावे केले आहेत. आमदारांना ५० कोटी रुपये, एक फ्लॅट आणि एक कार देण्याची ऑफर दिली जात आहे. हा घोडेबाजार विरोधी पक्षातील आमदारांसाठी नव्हे तर काँग्रेसमध्येच अंतर्गत गटांमध्ये सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
काँग्रेसने भाजप नेत्याचे दावे फेटाळले आहे. त्यानंतर आता केंद्रीय मत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही मोठे विधान केले आहे. पुढील पाच-सहा महिन्यांत राज्यात कोणतीही क्रांती होऊ शकते, असे ते म्हणाले आहेत. कर्नाटकात पुढील काळात राजकारणात अविश्वसनीय घटनाक्रम पाहायला मिळतील, त्याची अपेक्षा कुणीच केली नसेल, असे भाकित त्यांनी वर्तविले आहे. 

राज्यातील सध्याच्या घटनाक्रमांवर नजर टाकली तर आगामी काही दिवसांत विश्वास बसणार नाही, अशा घटना घडतील. राजकारणात कोण कधी कोणता निर्णय घेईल, हे सांगणे कठीण आहे. राज्यात सध्याची सध्याच्या स्थितीकडे पाहिल्यास कोणतीही क्रांती होऊ शकते, असे कुमारस्वामी यांनी म्हटल्याने राजकारणात वादळ उठले आहे.

कर्नाटक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते असलेल्या नारायणस्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सत्तेसाठी एवढी रस्सीखेच सुरू आहे की, काँग्रेसमधील दोन मोठे गट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकमेकांचे आमदार तोडत आहेत. आधी माहिती मिळाली होती की, आमदारांना ५० कोटींची ऑफर दिली जात होती. आता हा आकडा ७५ ते १०० कोटींवर पोहचला आहे. काही आमदारांना ५० कोटी, एक फ्लॅट आणि एक फॉर्च्यूनर कार अशी कॉम्बो ऑफर दिल्याचे समजते.
हे आरोप फेटाळून लावत काँग्रेसने भाजप घाणेरडं राजकारण करत असल्याचा पलटवार केला. काँग्रेस प्रवक्त्याने सांगितले की, भाजपकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे दावे केले जात आहेत. राज्यात खोटी माहिती पसरवून स्थिती बिघडविण्याचा प्रयत्न आहे. भाजपचा दावा हास्यास्पद आणि लाजीरवाणा आहे. भाजपकडे कोणतेही पुरावे नाही, असेही काँग्रेसने म्हटले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.