पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम; कर्नाटकात नेतृत्वबदलावरून सिद्धरामय्या यांची भूमिका; शिवकुमार समर्थक आमदार दिल्लीत
बंगळुरू : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सिद्धरामय्या विरुद्ध डी. के. शिवकुमार असा संघर्ष तीव्र झाला आहे. शिवकुमार यांच्या समर्थकांनी दिल्लीला धाव घेतली आहे. नेतृत्वबदलाबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यायचा आहे असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य आमच्यासाठी आदेश आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी भूमिका स्पष्ट केली. शिवकुमार यांचे सहा समर्थक आमदार दिल्लीत दाखल झाले असून, आणखी काही जण राजधानीत दाखल होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने अडीच वर्षाचा कालावधी २० नोव्हेंबरला पूर्ण केला. त्यामुळे नेतृत्वबदलाच्या चर्चांना वेग आला. पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचे पालन केले जाईल असे सिद्धरामैय्या यांनी स्पष्ट केले. त्याबाबत उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यावर अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद ठरल्याचे सांगितले जाते. याबाबत माजी प्रदेशाध्यक्ष आणि गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे जाहीर केले. राज्यात दलित मुख्यमंत्री का होऊ नये? असा त्यांचा सवाल आहे. सिद्धरामैय्या यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची बंगळूरुत भेट घेतली.खरगे हे दिल्लीत राहुल गांधी यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. काँग्रेसश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील असे खरगे यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेतृत्वाने जर मंत्रिमंडळ फेरबदलाला परवानगी दिली तर सिद्धरामैय्या आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करतील असा संदेश त्यातून दिला जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.