मुंबई,:- राज्याचे सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर 1 डिसेंबरपासून राजेश अग्रवाल हे नवे मुख्य सचिव असतील. अगरवाल हे 1989 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे या आधी केंद्र सरकारच्या दिव्यांग खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी होती. या आधी 30 जून रोजी राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची कारकीर्द आता 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. नवे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना प्रशासनात दीर्घ अनुभव असून त्यांचे काम तितकेच प्रभावी ठरले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, वित्तीय सुधारणा आणि सामाजिक कल्याण योजनांमध्ये त्यांनी केलेली कामगिरी त्यांना देशातील प्रगतीशील प्रशासकांपैकी एक बनवते.
राजेश अग्रवाल यांनी आयआयटी दिल्ली येथून बी.टेक पदवी प्राप्त केली. प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतरही त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर शासन व्यवस्थेत कसा प्रभावी ठरू शकतो, यावर सातत्याने काम केले. केंद्रात कार्यरत असताना अग्रवाल यांच्या आधार, जनधन, डिजिलॉकर या कामाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. तसेच सामाजिक न्याय उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देण्यात त्यांचा हातभार महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्र कॅडरमध्ये नियुक्तीनंतर अग्रवाल यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.यामध्ये अकोला आणि जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी अनेक विकासकामांना गती दिली. मुंबई महानगरपालिकेत उपायुक्त पदावर असताना शहरी व्यवस्थापनाशी संबंधित विविध प्रकल्प राबवले. महाराष्ट्राच्या वित्त विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागात त्यांनी धोरणात्मक निर्णय, आर्थिक शिस्त आणि डिजिटल प्रशासनाला बळ देण्यावर भर दिला. अग्रवाल यांची तंत्रज्ञानाभिमुख विचारसरणी, प्रत्यक्ष कार्यशैली आणि केंद्र-राज्य पातळीवरील अनुभव यामुळे महाराष्ट्र प्रशासनाला नवे बळ मिळणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल प्रशासन, पारदर्शकता आणि कार्यक्षम गव्हर्नन्सला चालना मिळून राज्याच्या विकासयात्रेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.