भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा आज होणारा विवाह सोहळा अचानक पुढे ढकलण्यात आला आहे. आज (रविवार, २३ नोव्हेंबर) सांगलीमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, लग्नाच्या आनंदी वातावरणात अचानक एक दुर्दैवी घटना घडली. स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांची प्रकृती अचानक खालावल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मुहूर्ताच्या काही तास आधी घडली घटना –
सांगलीतील स्मृतीच्या नवीन निवासस्थानी गेल्या काही दिवसांपासून लग्नाची धामधूम सुरू होती आणि सर्व विधी पार पाडले जात होते. आज सायंकाळी ४.३० वाजता लग्नाचा मुहूर्त होता. मात्र, सकाळी नाश्ता करताना श्रीनिवास मंधाना यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. सुरुवातीला कुटुंबियांना वाटले की ही किरकोळ समस्या असेल, त्यामुळे त्यांनी थोडा वेळ वाट पाहिली. मात्र, प्रकृतीत सुधारणा न होता त्रास वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सांगलीतील ‘सर्वहित रुग्णालयात’ दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.
जोपर्यंत बाबा बरे होत नाहीत तोपर्यंत… –
या संपूर्ण घटनेची माहिती देताना स्मृती मानधनाचे मॅनेजर तुहिन मिश्रा यांनी सांगितले की, “आज सकाळी नाश्ता करताना सरांची प्रकृती बिघडली. स्मृती आपल्या वडिलांच्या खूप जवळ आहे आणि या घटनेने ती व्यथित झाली आहे. जोपर्यंत तिचे वडील पूर्णपणे बरे होऊन घरी येत नाहीत, तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.” आनंदाच्या क्षणी आलेल्या या संकटामुळे मानधना कुटुंब आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्मृतीचे वडील लवकर बरे व्हावेत, यासाठी सध्या प्रार्थना केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.