नंदूरबार: भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत. शिवसेनेचे (शिंदे) मंत्री, खासदार आणि आमदारांच्या मतदारसंघात समांतर नेतृत्त्व भाजपाच्या राज्यातील नेत्यांकडून उभे केले जात आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर शिंदे आणि भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला.
डहाणू येथील जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी 'त्यांचा अहंकार आणि एकाधिकारशाही शिवसेना (शिंदे) मोडून काढणार'असल्याचे जाहीर वक्तव्य केले. त्यानंतर मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात दुरावा दिसून आला. दोन्ही नेते दोन रिकाम्या खुर्च्यांचे अंतर ठेवून बसले. आता भाजपकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेसोबत कधीही युती करणार नाही, असे महाराष्ट्र भाजपच्या नेत्याने म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिवसेनेचे (शिंदे) पदाधिकारी फोडण्यात आले. शिंदेच्या आमदारांविरोधात लढलेल्या उमेदवारांना भाजपमध्ये प्रवेश दिले जात आहेत. महायुतीतील अतंर्गत वाद मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने समोर आला. शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदे लागलीच दिल्लीला गेले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत नाराजी पोहचवली. राज्यातील भाजप नेत्यांना आवर घालण्याची विनंती केली. मात्र केंद्रीय पातळीवरुनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा आहे.
आता पुन्हा एकदा भाजपकडून शिवसेनेबद्दल धक्कादायक वक्तव्य करण्यात आले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी मोठी घोषणा केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात आता शिवसेना शिंदे गटासोबत कधीही युती होणार नाही, अशी घोषणा चौधरी यांनी केली आहे. शिवसेना शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्ते भाजपच्या उमेदवारांना धमकावत आहेत. आमच्या उमेदवारांना धमक्या देणाऱ्या लोकांना जशास तसं उत्तर देऊ, नंदुरबार नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाकडून अनेक वर्षापासून भ्रष्टाचार केला जात आहे, असा आरोपही यावेळी विजय चौधरी यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. देशविघातक कृती करणाऱ्या लोकांवर कारवाई होते, मात्र त्याच लोकांचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार समर्थन करतात, असंही ते यावेळी म्हणाले. सोमवारी नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. शहादा शहरात फडणवीस यांची सभा होणार आहे. या जाहीर सभेत फडणवीस शिवसेनेसोबतच्या (शिंदे) युतीवर काय बोलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.