'महायुतीत भाजपने पाठीत खंजीर खुपसला; ही तर कार्यकर्त्यांची भावना': भाजपसोबतच्या संबंधावर एकनाथ शिंदेंचे भाष्य
स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना एकमेकांविरोधात लढली तरी शत्रू फक्त महाविकास आघाडीच असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक लढवत असल्याचा शिंदे यांनी दावा केला आणि आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील योजनांचे कौतुक केले. राजकीय टीकांवर प्रत्युत्तर देत शिंदे यांनी विरोधकांवर अहंकार आणि असूयेचे आरोप केले. सोलापूर, 23 नोव्हेंबर : महायुतीत असूनही भाजपने पाठीत खंजीर खुपसल्याची भावना धाराशिवच्या शिवसैनिकांनी बोलून दाखवली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी भाष्य करताना 'ह्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना असतात' असे म्हटले आहे.
निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात लढलो म्हणजे मित्राचे शत्रू झालो, असे नाही. आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच आहे आणि तोच राहणार आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (ता. 23 नोव्हेंबर) सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, मोहोळ आणि सांगोल्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाष्य केल्याचे मानले जात आहे.शिंदे म्हणाले, ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे. लोकसभेला नरेंद्र मोदींसाठी आम्ही एकत्र होतो. विधानसभेला महायुती जिंकली. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणूक लढण्याच्या भावना असतात, त्यामुळे आम्ही एकमेकांविरोधात लढलो म्हणजे मित्राचे शत्रू नाही झालो. आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीचा आहे आणि तोच राहणार आहे.
आम्ही विकासाच्या मुद्द्यावर नगरपालिका निवडणूक लढवतोय. या नगर परिषदेमध्ये विकासाची कामे झाली पाहिजेत. सर्वसामान्य माणसांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. ही शिवसेनेची भूमिका राहिली आहे. माझा जो मुख्यमंत्रिपदाचा अडीच वर्षांचा कालावधी होता, त्यात विकासालाच प्राधान्य दिले. लाडकी बहीण योजना आणि विकास यांची मी सांगड घातली, त्यामुळे विधानसभेला प्रचंड बहुमत मिळालं, असा दावा शिंदेंनी केला.
ते म्हणाले, मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान आणि आणि आम्ही नमो शेतकरी योजना सुरू केली. लाडकी बहीण तसेच समाजातील प्रत्येक घटकांसाठी आम्ही योजना आणल्या त्यामुळे आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत लँड्स स्लाईड विजय मिळाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील केलेल्या कामांवर आणि दिलेल्या योजनांवर आम्ही फोकस करत आहोत..पालघरच्या सभेत रावणाचा अहंकारही जळून खाक झाला होता, असे विधान शिंदे यांनी केले हेाते. त्या माध्यमातून त्यांनी भाजपवर टीका केल्याचे मानले जात होते. त्याबाबत स्पष्टीकरण देताना शिंदे म्हणाले, रावण कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अहंकार कुणाला आहे, हे सर्वांना माहिती आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा मुख्यमंत्री झालेला कुणाला पटत नाही आणि ते जमत नाही ती मळमळ, जळजळ ते नेहमीच व्यक्त करतात.घरात बसून लोकांच्या समस्या सोडवता येत नाहीत. उंटावरून शेळ्या कोण हाकत आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यापासून हे सर्व उबाठाचे सुरू आहे. कारण, त्यांना सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री झालेलं त्यांना बघवत नाही. गर्व, घमंड आणि अहंकार यामुळे रावणाची लंकाही जळून जाते. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावं, असा सल्लाही शिंदेंनी केला.एकनाथ शिंदे म्हणाले, ज्याप्रमाणे मुघलांना संतांची, धनाजी दिसायचे, त्याप्रमाणे त्यांना एकनाथ शिंदे दिसतात. बसता उठता झोपता त्यांना एकनाथ शिंदे दिसतात. माझ्या नावाशिवाय त्यांना भूक लागत नाही, झोप लागत नाही आणि त्यांचा दिवसही पूर्ण होत नाही. मुख्यमंत्री म्हणून मी अडीच वर्षाचे काम केलं, त्याचं मला समाधान आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दुरावा आला आहे का, या प्रश्नावर शिंदे म्हणाले, हे तुम्हीच प्रश्न आणि उत्तर हे सर्व तुम्हीच घडवता सगळं. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा सत्कार होता आणि त्या दोन खुर्च्या त्यांच्यासाठी होत्या. ते सत्कारमूर्ती होते. एका बाजूला मुख्यमंत्री होते आणि दुसऱ्या बाजूला मी होतो, त्यामुळे आमच्या कोणताही दुरावा नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.