नेत्यांची कामे करणारा तलाठी नको! धडाकेबाज जिल्हाधिकारी वानखडेंनी लोकांसमोरच दिले निलंबनाचे आदेश, होतेय कौतुक
जिल्हाधिकारी स्वप्निल वानखडे यांच्या कामाच्या पध्दतीमुळे ते लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. प्रामुख्याने जनसुनावणीदरम्यान त्यांच्याकडून जागेवर घेतल्या जाणाऱ्या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळत आहे. आता त्यांच्या एका आदेशाचेही सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी सुनावणीदरम्यानच थेट तलाठ्याचे निलंबन करण्याचे आदेश दिले.
मुळचे अमरावतीचे असलेले वानखडे हे सध्या मध्य प्रदेशातील दतियाचे जिल्हाधिकारी आहेत. जिल्ह्यात त्यांच्या जनसुनावणीची खूप चर्चा आहे. त्यामुळे या सुनावणीला लोकांची प्रचंड गर्दी असते. बुधवारी बसई येथे सुनावणी झाली. यावेळी स्थानिक लोकांनी तेथील तलाठी शैलेंद्र शर्मा यांची वानखडेंकडे तक्रार केली. तलाठी नेत्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तलाठ्याने एका नाल्याला बेकायदेशीरपणे वळविल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत तलाठ्याने जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर वानखडे चांगलेच भडकले. त्यांनी लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तलाठ्याला लगेच निलंबित करण्याचे आदेश दिले.संबंधित तलाठ्यांना लगेच निलंबित करण्याचे ऑर्डर काढा. ते नोकरीत राहणार नाहीत. जे नवीन तलाठी येतील, ते समजूतदार असायला हवेत. नेत्यांची कामे करणारे तलाठी नकोत. आपण लोकांसाठी आहोत. नेत्यांची कामे करण्यासाठी नाही. मी जेव्हा आदेश देतो, तेव्हा त्याचे पालन व्हायलाच हवे, असे जिल्हाधिकारी वानखडे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
पोलिसवाले, स्थानिक लोक सगळे सांगत आहेत की नाला तिथून जात होता आणि तुम्ही सांगत आहात नाला नव्हता. आम्ही नेत्यांसाठी काम करत नाही. जनतेसाठी काम करतो. जनतेसाठी काम करायला हवे. तुम्हाला हे कळत नाही. आता ऑर्डर काढत आहोत, असे शब्दांत वानखडे यांनी तलाठ्याला चांगलेच फैलावर घेतले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.