महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०२५-२६ या वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज' अभियानाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज (ता.३१) ला जारी करण्यात आला आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे घरफाळा आणि पाणीपट्टीमध्ये ५० टक्के मिळणारी सवलत आणखी वाढणार असल्याने सामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येते. ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य अशा चार स्तरांवर या अभियानांतर्गत मूल्यमापन केले जाते. मूळ शासन निर्णयानुसार या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ असा निश्चित करण्यात आला होता. मात्र, राज्यातील उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमांमुळे अभियानाच्या अंमलबजावणीवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे अधिकाधिक ग्रामपंचायतींना प्रभावी सहभागाची संधी मिळावी आणि सुरू असलेल्या उपक्रमांची पूर्तता करता यावी, या हेतूने शासनाने कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शासन निर्णयानुसार, 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज' अभियानाचा कालावधी आता १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत राहणार आहे. यामुळे ग्रामपंचायतींना विकासकामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार असून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.