पुणे :- शरीर सुखाची मागणी नाकारली म्हणून तिकीट कापलं! शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वारांवर खळबळजनक आरोप; सुषमा शेलारांचा मोठा गौप्यस्फोट!
पिंपरी: 'जे दाखवायचं ते दाखवत नाहीस' असे बोलून पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुस्कावर यांनी महानगरपालिका निवडणुकीचे तिकीट कापल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पिंपरी विधानसभा समन्वयक सुषमा शेलार यांनी पिंपरी येथे (दि.३१) पत्रकार परिषदेत केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाल्या की,शिवसेनेमध्ये गेले आठ वर्ष झाले काम करत असून पिंपरी विधानसभा समन्वयक म्हणून पक्ष वाढीसाठी काम केले आहे. पक्ष न्याय देईल या हेतूनेच प्रभागांमध्ये अनेक उपक्रम राबवले व अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत. कामे करत असताना पक्षाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी वारंवार शारीरिक मागणी करून हीन वागणूक दिली आहे. कामानिमित्त त्यांच्या पिंपरीतील कार्यालयात भेटण्यासाठी अनेक वेळा गेले तेव्हा त्यांनी अश्लील नजरेतून बघत “खूप छान दिसतेस, आज साडी चांगली आहे” म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे काम न करणाऱ्या निष्क्रीय गोपाळ मोरे या कार्यकर्त्याला तिकीट न दिल्यास राजीनामा देण्याचा दबाव पक्षावर चाबुस्कावर यांनी आणला. एका कार्यकर्तासाठी जिल्हा प्रमुख राजीनामा देतो का? या गोष्टीचा पक्षाने विचार करावा? पक्षाला वेठीस का धरले होते ? याचा खुलासा मी मीडिया समोर केला आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कासारवाडी येथे प्रचार करत असताना एका बिल्डिंगमध्ये प्रचारासाठी गेलो असता लिफ्टमध्ये त्यांनी मागून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसात धाव घेण्यासाठी प्रयत्न केले परंतु चाबूस्वार यांनी तुला आयुष्यातून उठवेल अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. काही दिवसांपूर्वी आकुर्डी येथील शिवसेना कार्यालयामध्ये बैठकीनिमित्त गेले असता तिथे त्यांना “पक्षांमध्ये काम केले आहे आता किती काम दाखवू” असे बोलले असता त्यांनी “जे दाखवायचे ते दाखवत नाही” असे अश्लील हावभाव करून शरीर सुखाची मागणी केली. मागील आठवड्यात कामानिमित्त महानगरपालिकेत गेले असता अचानक चाबुकस्वार यांची भेट झाली तेव्हा त्यांना “तिकटासाठी अडवणूक करू नका, निवडून आल्यास जिल्हा प्रमुख म्हणून तुमचेच नाव होणार आहे” असे बोलले होते. त्यावर चाबुकस्वार यांनी “तुला पहिल्यापासून सांगत आलोय कॉम्प्रोमाइज कर तिकीट फिक्स होईल” असे बोलून अप्रत्यक्षरीत्या शरीर सुखाची मागणी केली. सततच्या मागण्यांना नकार देत आल्यामुळेच तिकीट कापले आहे असे मत शेलार यांनी व्यक्त केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.