भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचा पहिलाच धडाकेबाज निर्णय; महाराष्ट्राच्या 'या' दोन 'गेमचेंजर' नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी
एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली वाढल्या आहेत.तसेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या तोंडावर आता भाजपच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.बिहारमधील मोठ्या यशानंतर आता भाजपनं आपला मोर्चा आता दक्षिण भारताकडे वळवल्याचं दिसून येत आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मंगळवारी (ता.20) नितीन नबीन यांच्याकडून पहिली मोठी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चंदीगड महापौर निवडणुकीसाठी विनोद तावडेंवरच निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी तावडे यांनी बिहार राज्य निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिले होते.
तसेच मंत्री व भाजप नेते आशिष शेलार यांची तेलंगणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी संजय उपाध्याय यांची ग्रेटर बेंगलुरू महापालिका निवडणुकीत सहप्रभारी म्हणून नियुक्तीपदाची धुरा देण्यात आली आहे. मुंबईतील विजयानंतर आशिष शेलार आणि संजय उपाध्याय यांना देशपातळीवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
विनोद तावडे यांच्याकडे 2022 पासून चंदीगड महापौर निवडणुकीसाठी जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी तावडे यांच्या नेतृत्वाखाली चारवेळा आकडा कमी असूनही भाजपने बाजी मारली आहे. कधी आपचे नगरसेवक फोडून,कधी निवडणूक अधिकाऱ्याने घातलेल्या घोळामुळे भाजपला यश मिळाले होते. 2024 मधील निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर एकदा आम आदमी पक्षाचा महापौर बसला होता.
आता जानेवारी 2026 मध्ये चंदीगड महापौरपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडे 18 आणि आम आदमी 11 + काँग्रेसकडे 7 अशी 18 मते आहेत. त्यामुळे तावडे यावेळी काय जादू करणार हे बघणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.