Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकाच रुममध्ये दोन महिला खेळाडू आढळल्या मृत, क्रीडा विश्वाला हादरवणारी घटना!

एकाच रुममध्ये दोन महिला खेळाडू आढळल्या मृत, क्रीडा विश्वाला हादरवणारी घटना!


क्रिडा विश्वाला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) वसतिगृहामध्ये दोन महिला प्रशिक्षणार्थी खेळाडू मृतावस्थेत आढळल्या आहेत. दोघींनी गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याचं सांगण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना केरळच्या कोलम जिल्ह्यात घडली.

सकाळी प्रॅक्टीसला न आल्याने घटना उघड
मिळालेल्या माहितीनुसार, सँड्रा ए (१८ वर्षे) आणि वैष्णवी व्ही (१५) अशी आत्महत्या केलेल्या खेळाडूंची नावे आहेत. सँड्रा ही १२ वीत शिकत असून ती ॲथलेटिक्सची प्रशिक्षणार्थी होती, तर वैष्णवी १० वीत शिकत असून ती कबड्डीची खेळाडू होती. गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास नेहमीप्रमाणे सरावाची वेळ झाली, मात्र या दोघी मैदानावर पोहोचल्या नाहीत. त्यामुळे वसतिगृहातील इतर विद्यार्थिनींनी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
एकाच खोलीत संपवली जीवनयात्रा

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दोघींनी एकाच खोलीत वेगवेगळ्या पंख्यांना बेडशीटच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, वैष्णवी ही दुसऱ्या खोलीत राहायची, परंतु बुधवारी रात्री ती सँड्राच्या खोलीतच झोपली होती. रात्री १२:३० वाजेपर्यंत इतर विद्यार्थिनींनी या दोघींना एकत्र पाहिले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
दोन्ही खेळाडू गेल्या दोन वर्षांपासून या 'साई' वसतिगृहात राहून प्रशिक्षण घेत होत्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून खोलीची कसून झडती घेतली, मात्र तिथे कोणतीही 'सुसाईड नोट' सापडलेली नाही. त्यामुळे या दोन्ही महिला खेळाडूंनी अशाप्रकारे टोकाचं पाऊल का उचललं? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या घटनेमुळे कोलम परिसरातील क्रीडा संकुलात शोककळा पसरली असून, पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर  दाखल केला आहे. वसतिगृहातील इतर खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात असून पुढील तपास सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.