Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्य शिक्षण मंडळाची मोठी कारवाई! दहावी, बारावीची परीक्षा केंद्रे रद्द

राज्य शिक्षण मंडळाची मोठी कारवाई! दहावी, बारावीची परीक्षा केंद्रे रद्द


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार राज्यभरातील दहावीची ३१, बारावीची ७६ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली असून, कारवाई करण्यात आलेली सर्वाधिक परीक्षा केंद्रे छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राज्यभर राबवण्यात येते. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची तपासणी, भरारी पथकांच्या भेटी, बैठी केंद्रे, जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या भेटी, ड्रोनद्वारे निगराणी, पोलीस बंदोबस्त, परीक्षा केंद्रांबाहेर दृकश्राव्य चित्रीकरण अशा विविध उपाययोजना करण्यात येतात. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार भरारी पथकाने पकडल्यास संबंधित केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा इशारा गेल्या वर्षी राज्य मंडळाने दिला होता. त्यानंतर २०२५मध्ये दहावीच्या परीक्षेत गैरप्रकारांमध्ये घट झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यात दहावीच्या परीक्षेत ८९, तर बारावीच्या परीक्षेत ३६० प्रकरणांची नोंद झाली होती.

राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५च्या परीक्षेत राज्यभरात एकूण ३४ केंद्रांवर भरारी पथकांमार्फत गैरप्रकारांची प्रकरणे आढळून आली. त्यापैकी पुणे विभागातील सात, नागपूर विभागातील सहा, छत्रपती संभाजीनगर विभागातील १०, मुंबई विभागातील एक, लातूर विभागातील सात, अशा एकूण ३१ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. कोकण, नाशिक, कोल्हापूर, अमरावती या विभागातील एकही केंद्र नाही.

तर बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५च्या परीक्षेत राज्यभरातील ११२ केंद्रांवर भरारी पथकांमार्फत गैरप्रकारांची प्रकरणे आढळून आली. त्यापैकी पुणे विभागातील १२, नागपूर विभागातील ११, छत्रपती संभाजीनगर विभागातील २८, मुंबई विभागातील ५, अमरावती आणि नाशिक विभागातील प्रत्येकी ६, लातूर विभागातील ८ परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. कोकण, कोल्हापूर या विभागातील एकही परीक्षा केंद्राचा समावेश नाही. कारवाई केलेल्या परीक्षा केंद्रांची आकडेवारी पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर विभागातील परीक्षा केंद्रे सर्वाधिक असल्याचे दिसून येते. दहावी, बारावीच्या परीक्षेवेळी ज्या केंद्रांवर भरारी पथकाने भेट देऊन कॉपी प्रकरणे उघडकीस आणली, त्या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.