Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नारळाच्या झाडावरुन तरुण पडला; उपचारासाठी पैसे लागतील म्हणून मित्रांनीच तलावात बुडवून मारले

नारळाच्या झाडावरुन तरुण पडला; उपचारासाठी पैसे लागतील म्हणून मित्रांनीच तलावात बुडवून मारले


कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमागील गूढ पोलिसांनी उलगडले आहे. तपासात स्पष्ट झाले की, नववर्षाच्या पार्टीदरम्यान जखमी झालेल्या तरुणाची त्याच्याच मित्रांनी तलावात बुडवून हत्या केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदीप आणि प्रज्वल यांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींची भूमिका तपासली जात आहे.

तिघे जिवलग मित्र

विनोद कुमार (26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मगडी तालुक्यातील कल्याणपूर गावाचा रहिवासी होता. विनोद, सुदीप आणि प्रज्वल हे तिघेही जिवलग मित्र असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

नारळाच्या झाडावर चढवले; अपघातात गंभीर दुखापत
पोलिसांच्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी नववर्ष साजरे करण्यासाठी विनोदसह पाच मित्र पार्टीसाठी बाहेर पडले होते. पार्टीदरम्यान मद्यपानासाठी नारळपाणी आणण्याचा बेत करण्यात आला. इतर मित्र्यांनी विनोदला जबरदस्तीने नारळाच्या झाडावर चढून नारळ काढण्यास सांगितले. झाडावर चढताना विनोदचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. या अपघातात त्याच्या मणक्याला (स्पाइनल कॉर्ड) गंभीर दुखापत झाली आणि तो अत्यवस्थ झाला.
उपचार खर्चाच्या भीतीतून हत्या

विनोदच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येऊ शकतो, हे लक्षात येताच आरोपी घाबरले. पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की, या भीतीपोटी त्यांनी विनोदला 'घरी सोडतो' असे सांगून वाटेत वाजरहल्ली गावाजवळील एका तलावात बुडवून त्याची हत्या केली.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
तलावात बुडविल्यानंतर आरोपी गावात सामान्यपणे फिरत राहिले. सायंकाळी ते पुन्हा घटनास्थळी गेले, तलावातून मृतदेह बाहेर काढला आणि ताराने मोठा दगड बांधून तो जवळच्या विहिरीत फेकून दिला, जेणेकरून पुरावे नष्ट होतील.
पालकांच्या तक्रारीनंतर उलगडले प्रकरण

विनोद कुमार बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पालकांनी कुदूर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी बेपत्ता प्रकरण नोंदवून सखोल तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि मित्रांची चौकशी करताना सत्य समोर आले की विनोदची हत्या त्याच्याच मित्रांनी केली आहे.

पुढील तपास सुरू
सध्या मुख्य आरोपी सुदीप आणि प्रज्वल यांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींची भूमिका काय होती, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील सर्व पैलूंची बारकाईने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.