सांगली दि. 30 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी) दिनांक 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) दि. 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होत आहे. या परिक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये, त्या भयमुक्त व पारदर्शीपणे पार पाडाव्यात, यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवावे. भरारी पथकाने परीक्षा केंद्राना भेटी देऊन आवश्यक ती कार्यवाही चोखपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, महावितरणच्या कार्यकारी अभियंता तृप्ती दीपंकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, प्रत्येक परीक्षा केंद्रावर सर्व वर्ग खोल्यामध्ये सीसीटीव्ही लावावेत. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोखपणे ठेवावा, सर्व परीक्षा केंद्रावर अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहील याची दक्षता घ्यावी. परिरक्षक यांनी परीक्षा कालावधीत कस्टडी सोडू नये. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत जाण्यासाठी एस. टी. गाड्या नियमित वेळेत सोडाव्यात. सर्व परीक्षा केंद्रावर वर्ग खोल्या स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, फर्निचर आदि आवश्यक सुविधा राहतील याची दक्षता घ्यावी. याबाबत दररोज पडताळणी करावी.परीक्षा केंद्राच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचा फलक दर्शनी भागात प्रदर्शित करावा. परीक्षा केंद्रावर प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राची व्दितीय प्रवेशपत्राची ओळखपत्रानुसार दररोज तपासणी करावी. परिक्षेच्या कामात सहभागी नसलेल्या अनाधिकृत व्यक्तिंना परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये. परीक्षा केंद्रावर सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र वापरावे. गैरमार्ग प्रकरणाबाबत परीक्षार्थी गैरमार्ग शिक्षा सूचीनुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी दिल्या. प्रारंभी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी परिक्षे संदर्भात करण्यात आलेल्या तयारीचा सविस्तर आढावा सादर केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.