Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?

मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?


मुंबई : एकीकडे कल्याण डोंबिवलीतील चार नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर लगेच साथ सोडल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत पहिला धक्का बसला आहे. प्रभाग 157 मधून निवडून आलेल्या डॉ. सरिता म्हस्के शिंदे  यांनी ठाकरेंची साथ सोडल्याची माहिती आहे.

सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आहे. सेना भवनातील नगरसेवकांच्या बैठकीला डॉ. सरिता म्हस्के गैरहजर असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के यांनी प्रभाग क्रमांक 157 मधून भाजपच्या आशा तायडे यांचा पराभव केला आहे.

मुंबईत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. एकीकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये महापौरपदासाठी चढाओढ असताना दोन्ही गटांकडून इतर नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात ठाकरेंच्या एक नगरसेविका शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आहे. 

शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांची आज बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी सरिता म्हस्के या गैरहजर राहिल्या. तसेच गट नोंदणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक नवी मुंबईला रवाना झाले. त्यावेळीही सरिता म्हस्के गैरहजर राहिल्याने सस्पेन्स वाढला.

अपात्र करण्यासाठी हालचाली सुरू

सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना अपात्र करण्याची कार्यवाही शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू झाली आहे. सरिता म्हस्के जर शिंदेंसोबत गेल्या तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही 64 वर येईल.

किशोरी पेडणेकर गटनेतेपदी

ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत किशोरी पेडणेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

कल्याणमध्ये ठाकरेंचे चार नगरसेवक फुटले
कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 पैकी चार नगरसेवक फुटले असून ते शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. उर्वरित सात नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आम्ही सगळे एकत्र आहोत ,आम्हाला सत्ता स्थापनेसाठी फोन येतात मात्र वरिष्ठांच्या भूमिकेनंतरच निर्णय घेणार असं त्या नगरसेवकांनी म्हटलंय. तसेच आम्ही महाालिकेत एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू असंही त्या नगरसेवकांनी म्हटलं आहे. शिंदे आणि मनसेची साथ देणाऱ्या 4 नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा ठाकरेंकडून देण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.