सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी निवडणुकीत एकीकडे स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने व्यूहरचना सुरू असताना दुसरीकडे आघाडीच्या चर्चाही जोरात सुरू आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी सेमिफायनलचा दिवस असतानाही आघाडी किंवा युतीचा निर्णय झालेला नव्हता. सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये दिवसभर चर्चेच्या फेऱ्या आणि बैठका सुरू होत्या. भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन आघाडी उभी करण्याच्या दृष्टीने चर्चेची दिशा आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक असतानाही मंगळवारी सायंकाळपर्यंत कोणत्याही पक्षाची उमेदवार यादी जाहीर झालेली नव्हती. सर्वच पक्षांनी मुलाखतींची प्रक्रियाही पूर्ण केलेली नाही. इच्छुकांना निर्णय न दिल्याने त्यांच्यात संभ्रमावस्था आहे. पक्षांनी त्यांना ताटकळत ठेवले आहे. उमेदवारी निश्चित असलेल्या इच्छुकांना प्रचाराची सुरुवात करण्याचे अनधिकृत निरोप दिले आहेत.सर्वच पक्षांनी प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवली आहे. त्याच वेळी आघाडीसाठीही वाटाघाटी सुरू केल्या आहेत. त्या दृष्टीने सोमवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. आघाडी किंवा युती झाल्यास पक्षांच्या वाट्याला कमी जागा येतील. परिणामी असंतुष्टांना आवर घालण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. आघाडीचे नेमके चित्र सोमवारीच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेससोबत हातमिळवणीची शक्यता आहे.
भाजपचे 'एकला चलो रे'?
भाजपची वाटचाल सध्यातरी 'एकला चलो रे'च्या दिशेेने असल्याचे दिसत आहे. महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढल्यानंतर बहुमतात गेलेल्या भाजपने जिल्हा परिषदेसाठीही महापालिकेचाच पॅटर्न राबवायचे ठरवल्याची चिन्हे आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्र येणार असल्याचे संकेत वरिष्ठांकडून मिळत आहेत. शिंदेसेना आणि जनसुराज्य पक्षांचेही उमेदवार रिंगणात उतरणार आहेत.
शेवटच्या क्षणी एबी फॉर्म?
सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या खूपच मोठी आहे. त्यामुळे बंडखोरांचे पीक येणारे हे निश्चित आहे. पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या काही तासांत एबी फॉर्म देण्याची खेळी पक्षांकडून केली जाऊ शकते. सोमवारी जिल्हाभरात मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले; पण त्यामध्ये युती किंवा आघाडीचे अधिकृतरीत्या घोषित उमेदवार नव्हते. उमेदवारी निश्चित असलेल्या इच्छुकांना पक्षनेत्यांनी अर्ज भरण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. त्यांना ऐनवेळी एबी फॉर्म दिला जाऊ शकतो.
आज शेवटचा दिवस
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी (दि. २१) दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. अर्ज दाखल करण्याच्या १६ ते १९ जानेवारी या कालावधीत जिल्हाभरात अत्यल्प अर्ज दाखल झाले. सोमवारी त्यांची संख्या वाढली. बुधवारी शेवटच्या दिवशी मात्र गर्दी होण्याची शक्यता आहे. गुरुवारी अर्जांची छाननी होणार असून, माघारीसाठी आठवडाभराची म्हणजे २७ जानेवारीपर्यंतची मुदत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.