शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; 'पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी २० वर्षांचा राजकीय संघर्ष बाजूला सारून ऐतिहासिक युती केली आहे. रविवारी शिवाजी पार्कवरील भव्य सभेनंतर या ठाकरे बंधूंची जोडी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात पोहोचली आहे. सोमवारी झालेल्या ठाण्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर अत्यंत गंभीर कडाडून टीका करत जोरदार हल्ला केला आहे.
भाजपवर पैशांच्या राजकारणाचा आरोप
ठाण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, आज घराघरात ५ हजार रुपये वाटले जात आहेत. मला पैसे देणाऱ्यांची चिंता नाही, तर पैसे घेणाऱ्यांची चिंता वाटतेय. भाजपने मतदारांना गृहीत धरले आहे. तसेच, राजकारणातील फोडाफोडीवर निशाणा साधताना राज ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला. तसेच, कोणाला ५ कोटी, कोणाला १० कोटी तर कोणाला १५ कोटींची ऑफर दिली जात आहे. सोलापुरात तर आमच्या माणसाला मारले गेले, असे म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षावर हल्ला चढवला.
अदानी प्रकरणावर राज ठाकरेंचे प्रत्युत्तर
राज ठाकरे यांच्यावर अदानींशी मैत्री असल्याचा आरोप करत काही जुने फोटो व्हायरल करण्यात आले होते. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “काल मी अदानींचे प्रकरण काढले तर काही लोकांना मिरच्या झोंबल्या. ते माझे दोन-चार वर्षांपूर्वीचे फोटो दाखवत आहेत. माझ्या घरी अदानी आले, रतन टाटा आले, अंबानीही आले. पण घरी आले म्हणून मी त्यांची पापं झाकायची का?”राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, व्यक्तीगत भेटीगाठी आणि सार्वजनिक हित यात मोठी तफावत आहे. “घरी आल्यावर कोणाला हाकलून थोडेच देणार? पण जेव्हा महाराष्ट्रावर, मुंबईवर किंवा ठाण्यावर संकट येईल, तेव्हा राज ठाकरे दोस्ती-बिस्ती बघणार नाही. अदानीशी दोस्ती करण्याचा तर विषयच नाही, मी इतका ‘अडाणी’ नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.