स्लिपवर नाव आईचे, फोटो मुलाचा! मतदार यादीतील घोळामुळे मतदान केंद्रावर गोंधळ; सांगली महापालिकेतील प्रकार
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या ७८ जागांसाठी आज मतदान सुरू असून, सकाळपासूनच मतदार यादीतील त्रुटींमुळे मतदारांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून आले. अनेक मतदान केंद्रांवर नाव शोधण्यासाठी मतदारांची गर्दी झाली होती. काही ठिकाणी मतदार व कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
शासनाकडून वाटप करण्यात आलेल्या मतदार स्लिपमध्ये गंभीर चुका असल्याचे प्रकार उघडकीस आले. गावभागातील एका मतदान केंद्रावर मतदार स्लिपवर आईचे नाव असून फोटो मात्र मुलाचा असल्याचा प्रकार समोर आला. संबंधित मतदार आपल्या आईला घेऊन मतदानासाठी केंद्रावर गेले असता, हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. या मतदाराचे नाव ऑनलाईन प्रणालीत दिसत नव्हते; मात्र प्रत्यक्ष मतदार यादीत नाव आढळल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मतदानाचा हक्क बजावू दिला.दरम्यान, मतदार स्लिपवर खोली क्रमांक (रूम नंबर) दिला असला तरी तो नेमका कुठून सुरू होतो, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याने मतदारांना मतदान केंद्रावर एकापेक्षा एक वर्ग फिरावे लागत होते. अनेक केंद्रांवर पोलिस कर्मचाऱ्यांनाही खोली क्रमांकांची माहिती नसल्याने मतदारांचा गोंधळ अधिकच वाढला.विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. "स्लिपवर सर्व माहिती असूनही योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे मतदानासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत," अशी नाराजी अनेक मतदारांनी व्यक्त केली. मतदार यादी व स्लिप वितरणात झालेल्या त्रुटींमुळे प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी टप्प्यांत अशा चुका टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.