Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गल्ली अन्‌ गल्ली पालथी घाला, नशेखोरांचे कंबरडे मोडा; डार्क स्पॉटवर पालिकेचे दिवे बसवा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

गल्ली अन्‌ गल्ली पालथी घाला, नशेखोरांचे कंबरडे मोडा; डार्क स्पॉटवर पालिकेचे दिवे बसवा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील


सांगली : सांगली शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी पोलिसांची गस्त झाली पाहिजे. शहरातील गल्ली अन्‌ गल्ली पालथी घाला, दिसेल त्या ठिकाणी नशेखोरांचे कंबरडे मोडा, कायद्याचा धाक निर्माण करा, अशा सक्त सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिस दलाला दिल्‍या.


तसेच शहरातील डार्क स्पॉटवर गस्त झालीच पाहिजे. परंतु त्या डार्क स्पॉटवर सीसीटीव्ही आणि दिवे लावण्याची जबाबदारी पालिकेची आहे. ती तातडीने झाली पाहिजे, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी आज दिल्या.

जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव उपस्थित होते.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियान गेले वर्षभर सुरू आहे. याचा प्रभाव वाढविण्यासाठी पोलिस प्रशासनासह औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क यांनी एकत्रित धाड मोहीम हाती घ्यावी.

पालिका क्षेत्रातील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणांची कडक तपासणी करावी, पोलिस दलाने गस्त वाढवून अधिकाधिक कठोर पावले उचलावीत. कोणाचीही गय करू नये.' ते म्हणाले, 'प्रत्येक डार्क स्पॉटवर पोलिसांची गस्ती सुरू आहे. परंतु त्याठिकाणी दिवे, सीसीटीव्ही तातडीने लागले पाहिजे. पालिका प्रशासनाने पोलिस दलाची मदत घेऊन त्याठिकाणी दिवे तातडीने लावावेत.

तसेच ज्या ठिकाणी गांजाची शेती आहे, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण होईल, असे प्रशासन झाले पाहिजे.' पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने माहिती सादर केली.

यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.