Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजितदादा म्हणजे शरद पवारांचे हुकमी एक्के, शोकसभेत काय म्हणाले जयंत पाटील?

अजितदादा म्हणजे शरद पवारांचे हुकमी एक्के, शोकसभेत काय म्हणाले जयंत पाटील?

मुंबई : राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघात झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अजितदादा यांचे निधन झाले. 28 जानेवारी रोजी झालेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले.

सोमवारी (23 फेब्रुवारी) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शोकसभा वरळीतील डोम येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी, राज्याचे नेते, अभिनेते, उद्योजक अशी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी हजेरी लावली आणि अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रोखठोक अजितदादा

शोकसभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "कुठून सुरू करू आणि कुठे थांबू अशा अनेक आठवणी अजितदादांसोबत आहेत. 1991 पासून आमची राजकीय कारकिर्द जवळपास एकत्रच सुरू झाली. त्यानंतर सभागृहामध्येही आम्ही एकत्रच बसत होतो. 2014 पासून तर शेजारी बसण्याचे अनेक प्रसंग आले. खुल्या मनाचा, दिलदार मनाचा आणि विरोध करायचा असले तर ठामपणे विरोध करणारा नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिले जात होते. राजकारणात गोड बोलाव लागते, असे अजितदादांना आम्ही सांगायचो. त्यावेळी ते म्हणाले की, गोड तुम्ही बोला, ते माझ्या स्वभावात नाही. इतके रोखठोकपणे अजितदादा बोलायचे" असे म्हणत त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

शरद पवारांचे हुकमी एक्के

आमदार जयंत पाटील या शोकसभेत म्हणाले की, "आर. आर. आबा गेल्यानंतर मी सतत बोलत होतो, आबा जेष्ट आहेत ते पुढे आहेत. त्यानंतर तुम्ही आणि मग मी असेन. मी कारकीर्दीच्या बाबत बोलत होतो, मात्र हे असे होईल असे वाटले नव्हते. अजितदादांनी स्वतःच्या बारामतीची काळजी घेतली महाराष्ट्राची काळजी देखील घेतली. शरद पवारांवर त्याचे खूप प्रेम होते. आजही शरद पवारांचा हुकमी एक्का अजित पवारच होते." असे म्हणत त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये कसे नाते होते? ते सांगितले.

एकच वादा, अजितदादा

"महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे गेलो, तिथे जनतेतून आवाज येत होता. 'एकाच वादा, अजितदादा,' राजकारणात एकसंघपणे काम करावे, हे अजित पवारांचे स्वप्न होते. हे करत असतानाचा नियतीने घात केला," असे विधान करत आमदार जयंत पाटील यांनी विलीनीकरणावर प्रकाश टाकला. "अजितदादांना टापटीपपणा आवडत होता. एखाद्या मतदारसंघातील एखादे काम करायचे असेल, तर स्पष्टपणे फोन करून सांगायचे. अजित पवारांना जे करायचे असायचे, ते तेच करायचे," असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.