पिंपरी : मुंबई क्राईम ब्रांच आणि ‘विश्वास नांगरे-पाटील’ बोलत असल्याचे भासवून ईडीची खोटी नोटीस पाठवून आणि अटकेची भिती दाखवून सुप्रीम कोर्टाच्या फंडामध्ये आम्ही सांगतो तेवढी रक्कम जमा केल्यास अटक थांबवितो असे सांगून एका व्यक्तीची १९ लाख १ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
ही घटना २९ नोव्हेंबर २०२५ ते ८ डिसेंबर २०२५ दरम्यान दिघी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली. या प्रकरणी एका पुरुषाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध मोबाईल क्रमांक आणि बँक खाते धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना व्हाईस, व्हॉट्सअॅप, ऑडिओ कॉल केले. मुंबई क्राईम ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगितले. आधार कार्डचा गैरवापर झाला आहे. त्यावरुन विविध बँकेचे एटीएम कार्ड बनविण्यात आले आहेत. लोकांची फसवणूक करणारी तुमची एक टोळी असल्याची माहिती मिळाल्याचे आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना सांगितले. तुमच्या खात्यावरुन मनी लाँड्रिंग होत असल्याचीही माहिती असल्याचे सांगतून त्यांना ईडीची खोटी नोटीस पाठवून अटकेची भीती दाखवण्यात आली. याबाबत कोणाला सांगितले तर तत्काळ अटक केली जाईल आणि सोसायटीमधील सर्व लोकांसमोर तुम्हाला घेऊन जाऊ अशी भिती दाखविली. त्यानंतर एका नंबरवरुन फोन करुन ‘विश्वास नांगरे-पाटील’ बोलत असल्याचे भासविले. सुप्रीम कोर्टाच्या फंडामध्ये आम्ही सांगतो तेवढी रक्कम जमा केल्यास अटक थांबवितो असे फिर्यादीच्या वडिलांना सांगितले. अटकेची भिती दाखवून १९ लाख १ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.