Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी सांगलीत आठवडाभर रंगणार कला जागर :,सोमवारपासून ६५ वे राज्यस्तरीय कला प्रदर्शन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी
सांगलीत आठवडाभर रंगणार कला जागर :,सोमवारपासून ६५ वे राज्यस्तरीय कला प्रदर्शन 

- सांगलीला 20 वर्षांनी आयोजनाचा मान
- ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा होणार विशेष सन्मान
- राज्यभरातून प्राप्त निवडक बाराशे उत्कृष्ट कलाकृतींची निवड

सांगली:  - राज्यातील शासकीय व खासगी कला संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी सुमारे २० वर्षांनंतर सांगलीला या राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. महाराष्ट्राच्या कला सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण वारसा सांगणारे हे 65 वे कला प्रदर्शन सांगलीच्या वैभवात भर घालणारे ठरणार असून, ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा यावेळी विशेष सन्मान केला जाणार आहे.

दृश्य कला क्षेत्रातील विद्यार्थी व उदयोन्मुख कलाकारांना आपली कला व्यापक स्तरावर सादर करता यावी, त्यांच्या सुप्त कला गुणांना प्रोत्साहन मिळावे आणि त्याच्या प्रतिभाशक्तीला वाव मिळावा, यासाठी हे कला प्रदर्शन हक्काचे व्यासपीठ मानले जाते. ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग) हे दि. १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत "कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन आवार, सांगली येथे आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होत आहे. प्रदर्शनाची मांडणी सुरू असून ती रविवारपर्यंत पूर्ण होईल.

यंदा राज्यभरातून ३ हजार, ४९० विद्यार्थ्यांच्या एकूण ५ हजार ६८० कलाकृती प्राप्त झाल्या असून, त्यापैकी निवड समितीने १,२७५ उत्कृष्ट कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली आहे. या प्रदर्शनादरम्यान ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांच्या दीर्घकालीन कलात्मक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांचा विशेष गौरव हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्यात कला संचालनालयाच्या अंतर्गत शासकीय, शासनमान्य अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित कला संस्थांमध्ये दृश्य कलेचे पदवी, पदविका/ प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात. या सर्व कला संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य कला प्रदर्शन हे एक हक्काचे सर्वसमावेशक आणि प्रेरणादायी व्यासपीठ आहे. हे प्रदर्शन उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दर वर्षी राज्यातील विविध जिल्ह्यात आयोजित केले जाते. 

प्रदर्शन एकूण आठ विभागात असणार आहे. यामध्ये रेखा व रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला, मुद्राचित्रण, कला शिक्षक प्रशिक्षण, कला व हस्त व्यवसाय (धातूकाम, अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम, मातकाम), मूलभूत अभ्यासक्रम आणि दिव्यांग विभाग याचा समावेश आहे. प्रत्येक विभागातून चार कलाकृतींची पारितोषिकांसाठी निवड केली जाते. या वर्षी राज्यातील विविध कला संस्थांमधून ३ हजार ४९० विद्यार्थ्यांच्या एकूण ५ हजार ६८० कलाकृती प्राप्त झाल्या. प्राप्त कलाकृतीपैकी १ हजार २७५ कलाकृतींची निवड प्रदर्शन समितीने केली आहे. 

आजवर राज्य कला प्रदर्शन हे प्रामुख्याने कला महाविद्यालयीन विद्यार्थी आणि व्यावसायिक कलावंतांसाठी ओळखले जात असे, मात्र कला संचालनालयाच्या माध्यमातून शालेय स्तरावरील चिमुकल्या हातांना थेट राज्याच्या मुख्य कला प्रवाहात सामील करुन घेण्याचा क्रांतिकारक निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. राज्याच्या कला क्षेत्रासाठी ही उल्लेखनीय बाब आहे. या व्यासपीठावर आता शासकीय रेखाकला परीक्षा (ग्रेड परीक्षा) आणि बालचित्रकला स्पर्धेतील गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे. . शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील प्रथम प्रत्येकी ५ याप्रमाणे एकूण १० आणि बाल चित्रकला स्पर्धेतील राज्यस्तरावरील १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रथमच राज्य कला प्रदर्शनाच्या व्यासपीठावर केला जात आहे. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना थेट राज्याच्या मुख्य कला प्रवाहात सहभागी करून घेण्याचा हा निर्णय कला क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच महाराष्ट्राचा समृद्ध कला वारसा पुढील पिढीकडे पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरेल. 

पश्चिम महाराष्ट्रातील कला महाविद्यालयीन विद्यार्थी, कला शिक्षक आणि कला रसिक यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. सात दिवस चालणारे हे कला प्रदर्शन सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. सांगलीकर कलाप्रेमी, विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कलाविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
00000

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.