Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखेर ! व्हीएसआर व्हेंचर्सविरुद्ध तक्रार दाखल; रोहित पवारांच्या मागणीची घेतली दखल

अखेर ! व्हीएसआर व्हेंचर्सविरुद्ध तक्रार दाखल; रोहित पवारांच्या मागणीची घेतली दखल
 

बारामती येथे झालेल्‍या विमान अपघातात तत्‍कालीन उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या मृत्‍यूबाबत व्हीएसआर व्हेंचर्स आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध आमदार रोहित पवार यांनी केलेल्‍या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल केली. या अपघातानंतर बारामती येथे नोंदवलेल्या अपघाती मृत्यूच्या अहवालाशी हे प्रकरण जोडलेले असल्याने सदर तक्रार गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), पुणे यांच्याकडे वर्ग करण्‍यात आली असल्‍याची माहिती संबंधित पोलिस अधिकाऱ्याने दिली.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या अपघाताची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित कंपन्यांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी पोलीस आणि नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले. 
 
रोहित पवार म्‍हणाले, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत ठोस पुरावे उपलब्ध आहेत. तसेच प्रसारमाध्यमांमध्येही सर्व सत्य समोर आलेले आहे, तरीही पोलीस प्रशासन ठोस कारवाई का करत नाही, असा संतप्त सवाल त्‍यांनी उपस्थित केला. या प्रकरणातील दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत त्‍यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बराच वेळ चाललेल्या या गोंधळानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवार यांना एक लेखी पत्र दिले आहे, ज्यामध्ये प्राप्त तक्रारीनुसार तपास करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, पोलिसांच्या या आश्वासनाने समाधान न झाल्याने रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. अजितदादांवर प्रेम करणारे आम्ही सर्वजण गप्प बसणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजता बारामती तालुका पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी जाणार असल्याचे जाहीर केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.