सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
सांगलीत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी सुरू जिल्ह्यातील एकूण २११ पात्र शाळांमध्ये २०९७ जागा उपलब्ध असून प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवणार जिल्ह्यातील मिरज, मनपा सांगली आणि वाळवा तालुक्यांत सर्वाधिक जागा उपलब्ध
सांगली : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ (आरटीई) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी सांगली जिल्ह्यात आज १७ फेब्रुवारीपासून सुरू होत असून १० मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पालकांनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी केले आहे.
जिल्ह्यातील एकूण २११ पात्र शाळांमध्ये २०९७ जागा उपलब्ध असून प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अर्ज https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर भरता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC), दिव्यांग, एचआयव्ही बाधित किंवा प्रभावित बालके, अनाथ तसेच कोविड काळात पालक गमावलेल्या बालकांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी) कुटुंबांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
तालुकानिहाय उपलब्ध जागा
जिल्ह्यातील
मिरज, मनपा सांगली आणि वाळवा तालुक्यांत सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत. वाळवा
तालुक्यात ४९ शाळांमध्ये ४५३ जागा, मनपा सांगली क्षेत्रात ३४ शाळांमध्ये
४६७ जागा, तर मिरज तालुक्यात ३१ शाळांमध्ये ३२३ जागा उपलब्ध आहेत. याशिवाय
जत (१७०), पलूस (१९०), कवठेमहांकाळ (१२५), खानापूर (८६), तासगाव (१०९),
आटपाडी (६३), शिराळा (५२) व कडेगाव (५९) येथेही जागा उपलब्ध असल्याची
माहिती देण्यात आली.
आवश्यक कागदपत्रे अनिवार्य
अर्ज भरताना पालकांचे आधारकार्ड, बालकाचा जन्म दाखला, रहिवासी पुरावा, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), उत्पन्न दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.” ऑनलाईन अर्ज प्रक्रियेनंतर सोडत पद्धतीने प्रवेश निश्चित केला जाणार असून त्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल. पालकांनी एकच अर्ज अचूक माहितींसह भरावा, अपूर्ण किंवा चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो.”-मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी, सांगली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.