Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुप्रीम कोर्टातल्या टायपिस्टला ४ जॅकेट अन् तासाला १ हजार दिले, AI वापरून याचिका; १२वी पास तरुणाला सरन्यायाधीशांनी झापलं

सुप्रीम कोर्टातल्या टायपिस्टला ४ जॅकेट अन् तासाला १ हजार दिले, AI वापरून याचिका; १२वी पास तरुणाला सरन्यायाधीशांनी झापलं


आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केलीय. एका जनहित याचिकेवर सुनावणीवेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला कठोर शब्दात सुनावलं. याचिकाकर्त्याने एआयचा वापर करून याचिका दाखल केली होती. त्यात देण्यात आलेले संदर्भ हे तथ्यहीन होते. सरन्यायाधीशांनी सज्जड दम देताच याचिकाकर्त्याच्या वकिलांनी याचिका एआयच्या मदतीने लिहिल्याचं सांगण्यात आलं. सरन्यायाधीश म्हणाले की, अशा प्रकारे पुन्हा याचिका दाखल करू नका आणि भविष्यात असे प्रकार घडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.


सर्वोच्च न्यायालयात एका जनहित याचिकेवर सुनावणी आज झाली. जी याचिका दाखल करण्यात आली होती त्याबाबत सरन्यायाधीशांनी शंका व्यक्त करत याचिकाकर्त्याला ही तुम्ही स्वत: लिहिलीय का विचारणा केली. त्यावर याचिका कर्त्यानं मीच तयार केलीय आणि माझा फोनही जमा करतो असं सांगितलं. पुढे सरन्यायाधीशांनी त्याला शिक्षण किती आणि कुठे शिक्षण झालं हे विचारलं तेव्हा संबंधित याचिकाकर्त्याचं शिक्षण केवळं बारावीपर्यंत झाल्याचं आणि सनातन धर्म स्कूल लुधियाना इथं शिकल्याचं समोर आलं.

सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला तुमची इंग्रजीची चाचणी घेऊ, त्यात ३० गुण मिळाले तर याचिकेवर विचार करू असं सांगितलं. तसंच खरं सांगा नाहीतर मोठा दंड ठोठावू आणि तपासाचे आदेश देऊ अशा शब्दात इशारा दिला. त्यानंतरही याचिकाकर्त्याने आपणच याचिका लिहिल्याचा दावा करत माझा फोन तपासा आणि मी याचिकेतील संदर्भ देऊ शकतो असं सांगण्यात आलं. शेवटी सरन्यायाधीशांनी याचिकेतीलच fiduciary risk to corporate donors. याचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न करत मी शेवटचं विचारतोय असं म्हटलं.

याचिका नेमकी कुणी केली? ती तुम्ही लिहिल्यासारखी वाटत नाही असं सरन्यायाधीश म्हणाले. तेव्हा वकिलांनी एआय टूल्सचा वापर केल्याचा आणि सुप्रीम कोर्टातील एका टायपिस्टकडून टायपिंग करून घेतल्याचं सांगण्यात आलं. विशेष म्हणजे याचिका टायपिंग करण्यासाठी ४ जॅकेट आणि तासाला १ हजार रुपयेही दिल्याचं वकिलांनी सांगितलं.

याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानंतर सरन्यायाधीशांनी टायपिस्टला इथं हजर करा असे आदेश दिले. याचिकाकर्त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसरंच कुणीतरी ही तथ्यहीन अशी याचिका दाखल करत असल्यासारखं वाटतं. ही याचिका म्हणजे एक खोडसाळपणा आहे, तरीही याच्या तपासाचे आदेश न देता भविष्यात असे प्रकार घडल्यास कठोर कारवाई करू अशा इशारा सरन्यायाधीशांनी दिला. दरम्यान, याचिकाकर्त्याला तुम्ही तुमचं स्वेटर बनवण्याचं आणि विकण्याचं काम करा, अशा याचिका दाखल केल्या तर मोठ्या खर्चात पडाल असा हसत हसत मिश्किल सल्ला दिला. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.