Big Breaking! मंत्री झिरवाळ यांचा कथित व्हिडीओ कुणी रेकॉर्ड केला? नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपद सोडावे लागणार?
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची तृतीयपंथी व्यक्तीसोबतची अश्लील चित्रफित समाज माध्यमावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली. हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातच घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून झिरवाळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टीची मागणी केली आहे. यादरम्यान महायुतीतील मंत्र्याची ही अश्लील चित्रफित कुणी आणि कशी रेकॉर्ड केली, याबाबतची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्याविषयीचा हा आढावा…
झिरवाळ यांच्या कथित व्हिडीओत नेमके काय?
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या चित्रफितीमध्ये तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री झिरवाळ यांच्यासोबत दिसतो आहे. यादव याच्यावर मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी बहुल मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांची प्रसारित झालेली चित्रफीत सात महिन्यापूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. शासकीय निवासस्थानामध्ये तृतीयपंथी पवन हा मंत्री झिरवाळ यांच्याबरोबर बिछान्यावर असून त्याच्या शेजारी खाद्य आणि मद्य आहे.
झिरवाळ यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न?
या चित्रफीत प्रकरणाची नरहरी झिरवाळ यांना कल्पना होती. मंगळवारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या संदर्भात चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठा गोंधळ सुरू असल्याचे कळते आहे. मंत्री पदासाठी काहीजण इच्छुक असून त्यामधून झिरवाळ यांना लक्ष केले जात असल्याची चर्चा रंगली आहे. दोन महिन्यापूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. तेव्हाच विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची जोरकसपणे मागणी केली होती.
झिरवाळ यांचा कथित व्हिडीओ कुणी रेकॉर्ड केला?
मंत्री झिरवाळ यांची अश्लील चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर तृतीयपंथी पवन यादव यांचे बंधू रवी यादव यांनी ‘लोकशाही मराठी’ या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती मंत्री झिरवाळ हेच आहेत. माझा भाऊ पवन यादव यानेच हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. त्याचे झिरवाळ यांच्याशी अनेकदा अनैतिक संबंध ठेवले आहेत. पवन याला सरकारच्या तृथीयपंथीयांच्या बोर्डावर मोठे पद हवे होते. त्यामुळेच त्याने मंत्री झिरवाळ यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संबंध ठेवले आणि त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पवन याने अनेक आमदार आणि राजकीय नेत्यांबरोबर संबंध ठेवले असून त्याच्या मोबाईलमध्ये त्या संदर्भातील व्हिडीओ आहेत. त्याची सविस्तर चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येणार, असे रवी यादव यांनी सांगितले. हा सर्व प्रकार बाहेर आणल्यानंतर मला काही मंत्र्यांच्या कार्यालयातून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावाही त्यांनी केला.
काँग्रेसने केली झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी
मंत्री झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. विरोधकांनी याच मुद्द्याला हाताशी धरून राज्यातील सत्ताधारी महायुतीला लक्ष्य केले. मंत्र्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिरवाळ यांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. व्हायरल व्हिडीओची तातडीने चौकशी व्हावी आणि कारवाईदेखील करावी, असेही ते म्हणाले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावरून प्रतिक्रिया दिली. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? शासकीय निवास्थानात एखादा मंत्री असे कृत्य करीत असेल तर त्याच्यावर कारवाई नक्कीच व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तृथीयपंथी पवन यादव याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे अनेक मंत्र्यांबरोबर फोटोही असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपद सोडावे लागणार?
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांना मिळायला हवे, अशी मागणी करणारे झिरवाळ हे त्यांच्या पक्षाचे पहिले नेते होते. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करण्याचे अजित पवार यांनी ठरवले होते, असेही झिरवाळ यांनी जाहिरपणे सांगितले होते. यादरम्यान समाजमाध्यमांवर अश्लील चित्रफित व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. यासंदर्भात त्यांच्या पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, तसेच झिरवाळ यांच्या कार्यालयाकडूनही आम्हाला या चित्रफितीबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर झिरवाळ यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रीपद सोडावे लागणारे झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मंत्री ठरतील. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.