Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत गॅस तपासणीच्या नावाखाली ग्राहकांची लूट? 'गॅस ग्राहक कृती समिती' आक्रमक; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

सांगलीत गॅस तपासणीच्या नावाखाली ग्राहकांची लूट? 'गॅस ग्राहक कृती समिती' आक्रमक; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन


सक्तीच्या २३६ रुपयांच्या वसुलीची चौकशी करा; जीवनावश्यक कायद्यांतर्गत कारवाईची मागणी एकीकडे वाढती महागाई आणि आखाती देशांतील युद्धसदृश परिस्थितीमुळे गॅस टंचाई निर्माण होण्याची भीती असतानाच, सांगलीत गॅस एजन्सीच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मिरज येथील मे. श्री धनराज गॅस एजन्सीचे अधिकारी असल्याचे सांगून काही अज्ञात व्यक्ती ग्राहकांकडून सक्तीची तपासणी आणि प्रत्येकी २३६ रुपये वसूल करत आहेत. याविरोधात 'गॅस ग्राहक कृती समिती'ने जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली यांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नेमका प्रकार काय?
विश्रामबाग, सांगली येथील वारणाली रोड व विद्यानगर कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून काही संशयास्पद व्यक्ती घरोघरी फिरत आहेत. स्वतःला संबंधित गॅस एजन्सीचे अधिकारी भासवून ते 'गॅस तपासणी बंधनकारक आहे,' असे ग्राहकांना सांगत आहेत. यासाठी प्रत्येक ग्राहकाकडून २३६ रुपये शुल्क वसूल केले जात आहे. तसेच, दुरुस्तीच्या नावाखाली जादा पैसे उकळण्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे. या प्रकारामुळे सामान्य गॅस ग्राहक धास्तावले आहेत.
युद्धसदृश परिस्थिती आणि महागाईचा हवाला:

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात समितीने म्हटले आहे की, "सध्या महागाई गगनाला भिडली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषतः आखाती देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संवेदनशील काळात देशांतर्गत बाजारपेठेत गॅस आणि इतर इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ग्राहकांचे आर्थिक शोषण करणाऱ्यांवर 'जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत' कठोर कारवाई करण्यात यावी."

प्रशासनाला विचारणा व मागण्या:
ही गॅस तपासणी मोहीम अधिकृत आहे का?
गॅस पुरवठा कार्यालयाने किंवा शासनाने अशी कोणतीही पूर्वसूचना दिली आहे का?
पैसे वसूल करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
यावेळी निवेदन देताना गॅस ग्राहक कृती समितीचे योगेश रोकडे, पत्रकार व स्वतंत्र माहिती अधिकार कार्यकर्ते प्रमोद माळी, प्रकाश घाडगे, प्रकाश कोत्याळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या निवेदनाची प्रत प्रशासनाने स्वीकारली असून, लवकरच यावर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.