सगळं काही सुरळीत चाललंय. हे बघा, लोकांचे हाल आणि फरफट; मुंबईत एलपीजी गॅसटंचाईची आणीबाणी, सिलिंडरसाठी गर्दी, गोंधळ, हमरीतुमरी
मुंबईसह राज्यभरात गॅस सिलिंडरचा मुबलक साठा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असले तरी प्रत्यक्षात आठवडय़ाच्या बुकिंगनंतरही गॅस सिलिंडर मिळत नसल्याने गॅस टंचाईची आणीबाणीच निर्माण झाली आहे.
त्यामुळे रोजचे जेवण बनवण्याचे वांदे झाले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी कडाक्याच्या उन्हात सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या असून अक्षरशः झुंबड उडाली आहे. प्रचंड गर्दीमुळे गोंधळ, मारामाऱ्या आणि हमरीतुमरीचे प्रकारदेखील घडत आहेत. अनेक ठिकाणी चक्क पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण सुरू आहे.
आखाती देशातील युद्धामुळे भारतावर इंधन संकट ओढावले आहे. त्यामुळे अनेक राज्यांत एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस तुटवडय़ामुळे अनेक मोठी हॉटेल्स, खानावळी बंद झाल्या असून गृहिणींना गॅस मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. उपाहारगृहचालकांनीही गॅस नसल्याने टिफीन सेवा बंद केली आहे. तर गृहिणींना बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याने सकाळपासून तासन्तास सिलिंडरसाठी रांगेत उभे रहावे लागत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दोन किलोमीटरहून जास्त लांबीच्या रांगा लागल्या आहेत.
डिलिव्हरीचा मेसेज येतोय, पण सिलिंडर मिळत नाही
सिलिंडरसाठी ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर 2 ते 4 दिवसांत डिलिव्हरीचा मेसेज येतो. मात्र प्रत्यक्षात सिलिंडर मिळत नाही. काहींना तर बुकिंगनंतर दहा ते बारा दिवस झाल्यानंतरही सिलिंडर मिळालेला नाही. काही ठिकाणी पंधराशे रुपयांत ब्लॅकमध्ये सिलिंडर मिळत असल्याची तक्रार आहे.
पेट्रोल पंपांवर कर्मचाऱ्यांना मारहाण
इंधन टंचाईत पेट्रोलचा तुटवडाही निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर पेट्रोलसाठी तब्बल दोन किमीच्या रांगा लागल्या आहेत. तर जालन्यात एका पेट्रोल पंपावर टोळक्याने अधिकचे पेट्रोल दिले नाही म्हणून या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण केल्याचा प्रकारही घडला.
चहाचे 'चोचले' बंद
चहाप्रेमी नेहमीच आपल्या पसंतीचा स्पेशल चहा, ब्लॅक टी, बिनासाखर, मिडीयम गोड, मलई चहा अशा विविध प्रकारच्या चहाची मागणी करतात. मात्र गॅस टंचाईमुळे चहा विक्रेते आता फक्त एकाच प्रकारचा दुधाचा साधा चहा बनवत आहेत. त्यामुळे चहाचे 'चोचले' आता बंद झाले आहेत.
रिक्षाचालकांचा पंपावरच मुक्काम
गॅस मिळत नसल्याने व्यवसाय करणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रिक्षाचालक पहाटे 5 वाजल्यापासूनच गॅससाठी पंपावर रांगा लावत आहेत तर काही रिक्षाचालक गॅससाठी रात्री पंपावरच मुक्काम करीत आहेत.
बाटली, पॅनमधून पेट्रोल विक्रीला बंदी
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेट्रोलियम नियम 2002 नुसार जिह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर बाटली, कॅनमधून होणाऱ्या खुल्या पेट्रोल विक्रीला बंदी घातली आली आहे.
परळ, भोईवाड्यात पोलीस बंदोबस्तात वाटप
परळ, भोईवाड्यात भारत गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी सकाळपासूनच रांग लागली होती. यावेळी ग्राहक आणि चालकांचा वाद झाल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.
वसई-विरारवासीयापंडून चक्का जाम
गॅस, पेट्रोल मिळत नसल्याने संतप्त वसई-विरारवासीय रस्त्यावर उतरले. नागरिकांनी तुंगारफाटा परिसरातील रस्ता रोखून धरत संताप व्यक्त केला.
घाटकोपर, कांदिवलीत भरलेले सिलिंडर चोरले
कांदिवलीमध्ये गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोमधून 27 गॅस सिलिंडर पळवल्याची घटना घडली आहे. यामध्ये पाच सिलिंडर भरलेले तर 22 रिकामी होते. तर गॅस सिलिंडर घरपोच करणाऱया कर्मचाऱयांच्या गाडीवरील तीन सिलिंडर अनोळखी व्यक्तीने लंपास केल्याची घटना आज दुपारी घाटकोपरमध्ये घडली.
फसवतंय कोण?
सर्वसामान्यांना बुकिंग केल्यानंतर दहा दिवसांनीसुद्धा गॅस मिळत नसल्याची स्थिती आहे. डीलरही सिलिंडर उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नक्की फसवतंय कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.