Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचं ठरलं..; अध्यक्ष, उपाध्यक्षपदासह सभापतीपदाचे उमेदवार निश्चित

सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचं ठरलं..; अध्यक्ष, उपाध्यक्षपदासह सभापतीपदाचे उमेदवार निश्चित


सांगली : जिल्हा परिषदेत बुधवारी (दि. १८) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सत्तास्थापनेची तयारी केली असून अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतिपदांसाठीही नावे निश्चित झाल्याची माहिती आहे.
अध्यक्षपदावर हक्क सांगणाऱ्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला तूर्त वेटिंगवर राहावे लागणार आहे, तर मतदानावेळी शिंदेसेनेचे सदस्य तटस्थ राहण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, भाजपसह मित्रपक्षांचे सदस्यही सोमवारी कोल्हापूरला रवाना झाले. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्यचे नेते समित कदम व अन्य नेते आहेत.
निवडीची प्रक्रिया अवघ्या एका दिवसावर आल्याच्या स्थितीत मंगळवारी आघाडीच्या नेत्यांची सांगलीत बैठक होणार आहे. त्यामध्ये निवडीची प्रक्रिया, मतदान, व्हीप काढणे आदी प्रक्रियेवर चर्चा होईल. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतिपदांची नावे जवळजवळ निश्चित झाली आहेत, त्यामुळे उद्याची बैठक ही औपचारिक स्वरूपाची असेल. अर्थात, भाजपच्या संभाव्य डावपेचांचा बैठकीत अंदाज घेतला जाणार आहे. मंगळवारीच भाजपसह सर्व पक्षांचे व्हीप जारी होणार आहेत. आघाडीच्या अज्ञातस्थळी असलेल्या सदस्यांपर्यंत ते पोहोचविले जातील. तेथेच त्यांना मतदान प्रक्रियेची माहिती दिली जाईल.


..असे आहेत संभाव्य पदाधिकारी
अध्यक्ष - संगीता पाटील, कासेगाव (राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरद पवार)
उपाध्यक्ष - ऋषिकेश लाड (काँग्रेस)
सभापती - विनायक मासाळ, सावित्री तम्मनगौडा रवी-पाटील, स्नेहल मोरे (सर्व राष्ट्रवादी अजित पवार), अभिजित पाटील (उद्धवसेना).

शिंदेसेना तटस्थ राहणार?

सात सदस्यसंख्या असणारी शिंदेसेना प्रत्यक्ष मतदानावेळी तटस्थ राहण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते आमदार सुहास बाबर आणि तानाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा देण्याबाबत नकारात्मक सूर कायम ठेवला आहे. 'निवडणूक काळात भाजप आमदाराकडून झालेला त्रास कसा विसरणार', असा खडा सवाल त्यांनी पालकमंत्र्यांना विचारला आहे. तथापि, राज्यातील सत्तेची गणिते सांभाळण्यासाठी मुंबईतील पक्षनेते सांगलीत भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत आहेत. या स्थितीत शिंदेसेना तटस्थ राहण्याच्या मानसिकतेत आहे. 'भाजपला पाठिंबा दिला नाही, तरी विरोधही केला नाही' ही बचावात्मक भूमिका अवलंबली जाऊ शकते. तथापि, पक्षाच्या दोघा सदस्यांनी मात्र थेट आघाडीला पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवार गट तूर्त वेटिंगवरच
आम्हाला पहिली सव्वा वर्ष अध्यक्षपद हवे आहे. ते देईल त्याच पक्षाला आमचा पाठिंबा असेल अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी (अजित पवार) गेल्या महिन्याभरापासून घेतली होती. आता प्रत्यक्ष पक्षनेत्यांनी संयमाची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. पहिले अध्यक्षपद शरद पवार गटाला देण्यात येणार आहे. त्यानंतर सव्वा वर्षांनी अजित पवार गटाला संधी मिळेल, असे ठरल्याचे सांगण्यात आले. अर्थात, याची भरपाई करताना पक्षाला सभापतिपदांवर मात्र संधी मिळणार आहे. आघाडीला पाठिंबा देणारे उद्धवसेनेचे एकमेव सदस्य अभिजित पाटील यांनाही सभापतिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. भाजपच्या १६ सदस्यांसह जनसुराज्य व रयत क्रांती पक्षाचे मिळून १८ सदस्य कोल्हापुरात आहेत. तेथे स्नेहभोजनासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमचा कोणी सदस्य फुटेल किंवा पळून जाईल यासाठी सांगलीबाहेर आलेलो नाही. आमचे सर्व सदस्य एकगठ्ठा आहेत. - सम्राट महाडिक, जिल्हाध्यक्ष, भाजप

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.