रेल्वेची सांगली कनेक्टिव्हिटी वाढवा:,खासदार विशाल पाटील कराड-पंढरपूर नवा मार्ग; कोकणला जोडण्याचीही मागणी
सांगली :- दळवळणातून सांगली जिल्ह्याचा आर्थिक विकास साधण्यासाठी रेल्वे कनेक्टिव्हीटी अधिक मजबूत करण्याची मागणी खासदार विशाल पाटील यांनी आज संसदेत केली. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे गाडी सांगलीपर्यंत वाढवावी, कराड-पंढरपूर नवा रेल्वे मार्ग जिल्ह्यातून न्यावा, नागपूर-पुणे वंदे भारत गाडी मिरजेपर्यंत आणावी, अशी विविध मागण्या त्यांनी पटलावर ठेवल्या.
‘‘वैभववाडी-कोल्हापूर गाडीला सांगलीची कनेक्टिव्हिटी द्या.अशी मागणी करुन खासदार पाटील म्हणाले, त्यामुळे सांगली कोकणाशी जोडली जाईल. सांगलीत साखर, द्राक्ष, डाळींब, हळद अशा अत्यंत महत्वाची निर्यातक्षम उत्पादने आहेत. त्याचा आम्हाला निश्चित फायदा होईल. मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला मान्यता दिल्याबद्दल आभार, मात्र आता कराड ते पंढरपूर रेल्वे कनेक्टिव्हीटी करावी आणि ती सांगली जिल्ह्यातून न्यावी. जेणेकरून आमच्या जिल्ह्याला त्याचा फायदा होईल. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धेचं केंद्र असलेल्या पंढरपूरला दर्शनासाठी जाताना वारकऱ्यांना त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे. मिरज ते विटा हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. त्याचा एक रेल्वेमार्ग तयार करावा, अशी अपेक्षा आहे.’’
ते म्हणाले, ‘‘नागपूर-पुणे वंदे भारत गाडी पुण्यात येऊन आठ तास थांबते. पुण्यातून सांगलीचे अंतर तीन तासांचे आहे. ही गाडी जर सांगली-मिरजेपर्यंत पुढे आणता आली तर तेवढ्या वेळात येऊन परत जाऊ शकते. त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. सांगली-मिरज हे उत्पन्न देणारे केंद्र आहे. हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे गाड्या आपण आधीच सुरु केलेल्या आहेत. त्या उत्तम आहेत, मात्र या गाड्या पुढे मुंबईपर्यंत नेल्या तर अधिक फायद्याचे, सोयीचे होणार आहे. हुबळी ते मिरज गाडीचा विस्तार सांगलीपर्यंत करावा. सांगली स्थानकासाठी काही मागण्या आहेत. चेन्नई एक्सप्रेस, पुरी एक्स्प्रेस, निजामुद्दीन एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस या गाड्यांना सांगली थांबा मिळायला हवा. शिवाय, या स्थानकावर प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करायला हव्यात. विश्रांती कक्षासह अत्यावश्यक सुविधा दिल्यास नक्कीच फायदा होईल. काही गाड्या किर्लोस्करवाडीत थांबल्या पाहिजेत. त्याची यादी मी सादर करेन. डेमू, मेमू गाड्याही किर्लोस्करवाडीपर्यंत वाढवाव्यात. येथे आरक्षण कक्षाची वेळ वाढवण्याची गरज आहे. मिरज रेल्वे स्थानकावर बीओटीतून विकास प्रकल्प अर्धवट आहे. तो लवकर पूर्ण करावा.
*हवाई वाहतूक-रेल्वे*
*कनेक्टिव्हीटी महत्वाची*
खासदार विशाल पाटील म्हणाले, ‘‘कवलापूर विमानतळ प्रस्तावित आहे. या विमानतळापासून चार किलोमीटर अंतरावर माधवनगर रेल्वे स्थानक आहे. त्याचा विकास आराखडा बनवला तर निश्चितपणे एक चांगली सुविधा निर्माण होऊ शकते. त्यासाठी सुमारे दोनशे ते चारशे कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हवाई वाहतूक आणि रेल्वे वाहतूक यांची उत्तम कनेक्टिव्हीटी होऊ शकते. माधवनगर, नांद्रे, आमणापूर, भिलवडी, किर्लोस्करवाडी या स्थानकांचा विकास महत्वाचा आहे.’’
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
