Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये :- जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली :- पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये :-  जिल्हाधिकारी अशोक काकडे


सांगली : सांगली जिल्ह्यात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू आहे. सद्यस्थितीत उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी न करता, आवश्यक तेवढ्याच प्रमाणात इंधन खरेदी करावी. कोणतीही अडचण असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचे पेट्रोल 450 किलो लिटर व डिझेल 550 किलो लिटर, बीपीसीएल कंपनीचे पेट्रोल 520 किलोलिटर व डिझेल 650 किलोलिटर आणि आयओसीएल कंपनीचे पेट्रोल 1490 किलो लिटर व डिझेल 1420 किलोलिटर इतका साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. तरी सर्व ग्राहकांनी पेट्रोल व डिझेल पंपावर अनावश्यक गर्दी करणे टाळावे. पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्हा स्तरावरील दक्षता व फिरते पथकांच्या तपासण्या सुरु असून पेट्रोल डिझेलचे सुरळीत वितरण सुनिश्चित करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सध्या जिल्ह्यात एलपीजीचा एचपीसीएल कंपनीचा 2749 मेट्रिक टन व सुमारे 2037 मेट्रिक टन साठा मार्गावर, बीपीसीएल कंपनीचा 75.1 मेट्रिक टन व सुमारे 116.4 मेट्रिक टन साठा मार्गावर तसेच आयओसीएल कंपनीचा 43 मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध आहे. सर्व एलपीजी कंपन्यांच्या विक्री अधिकारी व प्रतिनिधींनी इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी. तसेच, जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी ग्राहकांना वेळेवर व नियमानुसार सिलिंडर पुरवठा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे, त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा साठा करण्यासाठी अनावश्यक गर्दी करू नये. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.