सांगली : मुलगा झाला! ४ दिवसांनी आई पळून गेली, परतलीच नाही; २ महिन्यांपासून लेकरू आईच्या मायेला पोरकं
सांगली येथील शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी एक महिला दाखल झाली. दोन महिन्यांपूर्वी तिला मुलगा झाला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत ती आई 'सिव्हिल'मधून निघून गेली, ती पुन्हा परतलीच नाही. आता हे बाळ निराधार आहे. त्याबाबत पोलिस तक्रार द्यायलाही 'सिव्हिल'ला वेळ नाही. 'त्या' निष्पाप बाळाला जन्मापासूनच संघर्ष करावा लागत आहे.
दरम्यान, पोलिसांनी तक्रारीसाठी रुग्णालयास पत्रव्यवहार केलाय म्हणे! पण हे रुग्णालय ऐकणारे नाही. शासकीय रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. गरिबांचा आधारवड म्हणून या रुग्णालयाकडे पाहिले जाते. इथे मूलभूत सुविधांची वानवा कायमची आहेच. त्यात आता नवीन घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी एक महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली. त्यावेळी तिचा केस पेपर, नाव व अन्य गोष्टी नोंदवून घेतल्याच असतील, असे आपणच गृहीत धरायला हवे. त्यानंतर त्या महिलेची प्रसूती झाली. तिला मुलगा झाला. गोंडस मुलाला सोडून ती माता निघून गेली. कोठे गेली, कधी गेली, हे कोणालाच माहिती नाही म्हणे! आश्चर्य आहे ना? इथंवर हे प्रकरण थांबले नाही. पोलिसांच्या काळजाला ही घटना भिडली. मग, त्यांनी त्यांच्या प्रमुखांच्या कानावर हा सारा प्रकार घातला. मग प्रमुखांनी तातडीने 'सिव्हिल' प्रशासनाला पत्र पाठवले. तक्रारीसाठी आवाहन केले. दरम्यान, या घटनेला आता आठवडा होत आला, तरीही 'सिव्हिल' मधून प्रतिसाद दिला जात नाही. त्या बाळाची हेळसांड होऊ नये, यासाठी 'सिव्हिल'ने बाल कल्याण समितीलाही संपर्क केलेला नाही. तातडीने करावा, इतकीच मागणी तेथील रुग्ण, नातेवाइकांची आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.