मातीचा ढीग अंगावर पडून दोन तरुणांचा मृत्यू; कऱ्हाड तालुक्यातील घटना, चरीत पाइप जोडण्यासाठी उतरले अन् काय घडलं?
कऱ्हाड: कऱ्हाड तालुक्यातील मनव येथे 'ठाकराची मळी' नावाच्या शिवारात ओढ्यावरील पाणी विहिरीत सोडण्यासाठी काढलेल्या चरीत पाइप जोडण्यासाठी उतरलेल्या दोघांचा मातीचा ढीग अंगावर पडल्याने आज गुदमरून मृत्यू झाला. किरण बाजीराव चव्हाण (वय ३०) व अमर रंगराव वडर (वय ३०, दोघेही रा. मनव, ता. कऱ्हाड) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनव शिवारात श्रीरंग हरी पाटील यांच्या शेताजवळ असलेल्या ओढ्यावरील विहिरीत पाणी सोडण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने दहा ते बारा फूट खोल चर काढण्याचे काम सुरू होते. चर काढल्यानंतर त्यामध्ये सिमेंटचे पाइप टाकण्यासाठी मनव येथील किरण चव्हाण आणि अमर वडर यांना सिमेंटची पाइपलाइन जोडण्यासाठी सांगण्यात आले होते. चर काढून झाल्यानंतर जेसीबी ऑपरेटर व त्यांच्यासोबत असणारे इतर जण बाजूला झाडाच्या सावलीला जेवण्यासाठी थांबले होते.जेवण झाल्यानंतर पाइप टाकूया, असे किरण आणि अमर यांना सांगण्यात आले होते. मात्र, किरण व अमर यांना इतर दुसऱ्या ठिकाणी काम असल्यामुळे त्यांना लवकर जायचे होते. त्यामुळे त्यांनी कोणालाही न सांगता काढलेल्या चरीमध्ये सिमेंटच्या पाइप जोडण्यासाठी उतरले असता, अचानक त्या चरीमधील मातीचा मोठा ढीग दोघांच्या अंगावर पडून त्यांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.काही वेळाने जेवण करून आलेले जेसीबी ऑपरेटर आणि इतर लोक जेव्हा कामाच्या ठिकाणी परतले, तेव्हा त्यांना दोघेही दिसले नाहीत. त्यांनी चरीकडे पाहिले असता तिथे मातीचा ढीग कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने माती बाजूला करून दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बराच वेळ मातीखाली दबले गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. दोघांचे मृतदेह बाहेर काढून जवळच असलेल्या उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.