Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

AAP मध्ये भूकंप! ७ खासदारांच्या बंडानंतर संजय सिंह यांनीही उचललं मोठं पाऊल

AAP मध्ये भूकंप! ७ खासदारांच्या बंडानंतर संजय सिंह यांनीही उचललं मोठं पाऊल


आम आदमी पक्षाच्या आमदारांनी निवडून दिल्याने खासदार झालेल्या राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत आपच्या अन्य सहा खासदारांनी भाजपची वाट धरली आहे. या राजकीय भूकंपामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता 'आप'लाही खडबडून जाग आली आहे. राघव चड्ढा व अन्य सहा खासदारांनी राज्यसभेत आपचा स्वतंत्र गट स्थापन करत तो भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेत तसे पत्र राज्यसभेच्या सभापतींना दिले आहे. संविधानातील परिशिष्ट दहामधील तरतुदीनुसार ही प्रक्रिया पूर्ण केल्याचे राघव चड्ढा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.


आपच्या सात खासदारांच्या या बंडानंतर आता त्यावरून तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. या सातही खासदार अपात्र ठरू शकतात, असा दावा ज्येष्ठ विधिज्ञ खासदार कपिल सिब्बल यांच्यासह अनेकांनी केला. त्यानुसार आता आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी या सात जणांना अपात्र ठरवावे, अशी विनंती राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे.

मीडियाशी बोलताना संजय सिंह यांनी सांगितले की, गद्दारी केलेल्या सातही खासदारांचे सदस्यत्व रद्द होणार, हे निश्चित आहे. संविधानातील तरतुदीनुसार ते अपात्र ठरली. अशाच घटनांबाबत सुप्रीम कोर्टाचेही अनेक निकाल आहेत. त्यानुसार सभापतींकडे विनंती अर्ज दाखल करून सात जणांना अपात्र ठरवावे, अशी विनंती केली आहे. तसेच तातडीने यावरील सुनावणी सुरू करावी, अशीही मागणी केल्याचे संजय सिंह यांनी स्पष्ट केले.

आपच्या सात खासदारांनी बंड केल्याने आपने पहिल्यांदाच हे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता सभापतींच्या निर्णयावर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत. सभापतींनी सात खासदारांची विलीनीकरणाची विनंती मान्य केल्यास आणि आपची मागणी फेटाळल्यास आपकडून सुप्रीम कोर्टात धाव घेतली जाऊ शकते. तसे संकेत संजय सिंह यांनी दिले आहेत. त्यामुळे आता सभापती काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.