नाशिक: भोंदुबाबा अशोक खरातचे काळे धंदे समोर येत असून गुन्ह्यांच्या वेगवेगळ्या बाजूंवर विशेष तपास पथक काम करीत आहे. खरातची आर्थिक फसवणूक, खासगी सावकारी असे गुन्हे समोर असतांना तपासी पथकाने सद्यस्थितीत महिलांचे लैंगिक शोषणसंबंधित गुन्ह्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत खरातविषयी असणाऱ्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे पथकाकडून आता शहर परिसरातील काही नामांकित डॉक्टरांचीही चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.
खरातच्या दुष्कृत्यांची यादी संपत नसतांना त्याच्याविषयी दाखल झालेल्या तक्रारी पोलीस यंत्रणेला चक्रावणाऱ्या आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्यात ३३ वर्षीय महिलेला भविष्याविषयी महत्वाचे बोलायचे असल्याचे सांगून कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात बोलावले. तांब्याच्या बाटलीतील पाणी पिण्यास दिले. धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण केले. यातून पीडितेला गर्भधारणा झाली. खरात याला हा प्रकार समजल्यानंतर औषधी गोळ्या खाण्यास देत गर्भपात घडवून आणला. पीडितेने या सर्व प्रकाराला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला तर तिचे वाटोळे होईल अशी धमकी खरात याने दिली. दरम्यान, विशेष तपासी पथक खरातकडे या गोळ्या कशा आल्या, त्या त्याला कोणी दिल्या, यासाठी वैद्यकीय मदत कोण करीत होते, या गोळ्याच्या सेवनामुळे शारीरिक व्याधी सुरू झाल्या काय, त्याचा शरिरावर काय परिणाम होतो, या अवैध किती महिलांचे गर्भपात झाले, यासह वेगवेगळ्या प्रश्नांवर पथक काम करीत आहे.तपासाच्या पहिल्या टप्प्यात खरात याच्या गुन्हेगारीचे वेगवेगळे पैलु समोर येत असतांना पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अशोक खरात काही गोळ्या, औषधे देत होता का, पाण्यात मिसळून काही देत होता का, अशा प्रश्नांची उकल करण्यात येत आहे. गर्भनिरोधक गोळ्या पीडितांना दिल्या जात असल्याचा पथकाला संशय आहे. महिलांना संमोहित करण्यासाठी काही औषधांचा वापर केला जात होता का, हा प्रश्न उपस्थित होत असून प्रश्नांचा गुंता सोडविण्यासाठी विशेष तपास पथक काम करीत आहे. या अनुषंगाने नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर तसेच सोनोग्राफी केंद्र चालकांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.