महिला अत्याचार प्रकरणातील नाशिकचा भोंदू अशोक खरातचे ठाणे कनेक्शन आता समोर आले आहे. खरातचा भक्त असलेला ठाणे महापालिकेचा वादग्रस्त अधिकारी महेश आहेर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पालिकेच्या एका लिपिक महिलेला आहेर याने नाशिकला नेले, तेथे खरातचे ‘दर्शन’ घेतल्यानंतर आहेरने तिच्यावर अत्याचार केला आहे. याबाबत पीडित महिलेने कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली असून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे आता ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. ठाणे पालिकेचा माजी अधिकारी महेश आहेर हा अशोक खरातचा भक्त आहे. त्याने नाशिक येथे अशोक खरातच्या कार्यालयात नेल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे. पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध काही अघोरी विधी करण्यात आले. तसेच तिला एक मोती खडा घालण्यास भाग पाडण्यात आल्याचेही महिलेच्या तक्रारीत म्हटले आहे. संबंधित पीडित महिलेला थंडपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करण्यात आला असून या घटनेचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचेही या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
गुन्हा दाखल होताच फरार
कासारवडवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणे गुन्हे शाखा करत असून आरोपी महेश आहेर सध्या फरार आहे. ठाणे पोलीस वादग्रस्त माजी अधिकारी आहेर याचा शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली असून या माजी अधिकाऱ्याची संपूर्ण ठाणे पालिकेत दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरू आहे.
लिंबू उत्तरवले, मोती खडा दिला
अशोक खरात ज्योतिषी असल्याचे आहेर याने त्या पीडित महिलेला सांगितले. खरात याच्या कार्यालयात गेल्यानंतर खरातने महिलेवरून लिंबू उतरवले तसेच त्यांना मोती खडा परिधान करण्यासाठी दिला असा आरोप महिलेने केला आहे.
खरातच्या पत्नीच्या नावाने उरणमध्ये २० गुंठे जमीन
कथित भोंदूबाबा खरात याने उरणमध्ये २० गुंठे जमीन पत्नीच्या नावे खरेदी केली असल्याचे उघडकीस आले आहे. शासकीय दराने खरेदी खत करून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात जमीन खरेदी विक्रीत अडीच ते तीन कोटींचा व्यवहार झाला असा संशय आहे. उरण चाणजे हद्दीत २० गुंठे जमीन ५८ लाख ५० हजार रुपयांमध्ये खरेदी केली आहे. या जमिनीचा खरेदी व्यवहार १२ मार्च २०२६ ला झाला आहे. त्यानंतर १७ मार्च २०२६ रोजी तलाठी कार्यालयात या जमिनीच्या खरेदीची वर्दी नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.