विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची आज रात्री वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत विधान परिषदेची उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचं खलबतं होण्याची शक्यता आहे. या बैठकीतील चर्चेनंतर काही नावांचा प्रस्ताव भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला जाऊ शकतो. त्यामुळे आता या यादीत नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्यातील विधान परिषदेतील 10 पैकी 6 जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. त्यामुळे या जागेवर आपल्याला संधी मिळावी यासाठी अनेक दिग्गजांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र भाजपचा आजपर्यंतचा इतिहास बघता ते उमेदवरी देताना काही धक्कातंत्रांचा देखील वापर करू शकतात.
एकीकडे विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जवळपास फिक्स झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता इतर पाच जागांवर उमेदवारी देताना भाजपकडून मागील काही निवडणुकांमधून आलेला अनुभव, तसंच जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा विचार होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.दरम्यान, भाजपमधील इच्छुकांनी विधान परिषदेसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात सध्या प्रज्ञा सातव, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, माधवी नाईक, राजेश पांडे, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी आणि संजय काका पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे आता या 12 जणांपैकी नेमकं कोणाच्या गळ्यात विधान परिषदेची उमेदवारी पडणार हे आजच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.