लोणी काळभोर, ता. 22 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगल कार्यालयांसमोरील बेशिस्त पार्किंगमुळे मंगळवारी (ता.21) सायंकाळी तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली. कुंजीरवाडी ते हडपसर दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिका, शाळेच्या बस तसेच आपत्कालीन सेवांची वाहनेही या कोंडीत अडकली होती. आमदार-खासदारांसह लोकप्रतिनिधी आणि पोलीस आयुक्तांकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अपेक्षित तेवढे प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत असल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. परिणामी, "पुणे-सोलापूर महामार्गाला कुणी वाली आहे का?" असा सवाल पूर्व हवेलीतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथील सोजस पॅलेस, इंद्रप्रस्थ, आकाश लॉन्स, कदमवाकवस्ती येथील मानली रिसोर्ट, काळभोर लॉन्स तसेच कुंजीरवाडी व थेऊर फाटा परिसरातील मंगल कार्यालयांमध्ये मंगळवारी (ता.21) अनेक विवाह व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची सुविधा नसल्याने पाहुण्यांची वाहने थेट महामार्गावरच उभी करण्यात आली. परिणामी, रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीचा वेग पूर्णपणे खुंटला. सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिली.
स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही वाहतूक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. "नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांकडून मूक संमती दिली जाते का?" असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे, या समस्येकडे स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीही पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या रोजच्या त्रासाकडे पाठ फिरवून केवळ कार्यक्रमांपुरतेच राजकारण केले जात असल्याची टीका होत आहे.
"आयुक्त साहेब, कोंडी कधी सुटणार?"
दरम्यान, वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला असून, "आयुक्त साहेब, पुणे-सोलापूर महामार्गावरील ही जीवघेणी कोंडी नेमकी कधी सोडवणार?" असा थेट सवाल प्रशासनाला विचारला जात आहे. ठोस कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. आता तरी पोलीस प्रशासन जागे होणार की नागरिकांना अशाच त्रासाला सामोरे जावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंगल कार्यालयांवर लगाम कधी?"
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगल कार्यालयांसमोरील बेशिस्त पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर "मंगल कार्यालयांवर कारवाई कधी होणार?" असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. नागरिकांना अशाच कोंडीत अडकून त्रास सहन करावा लागणार की प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा २४ तास धावता आणि तितकाच धोकादायक बनत चालला आहे. एचपीसीएल, इंडियन ऑईल, बीपीसीएलसारख्या मोठ्या कंपन्यांचे टँकर, अवजड वाहतूक, वाळूच्या गाड्या आणि प्रवासी वाहनांची सततची वर्दळ यामुळे हा मार्ग अक्षरशः गजबजलेला असतो. त्यातच महामार्गालगत असलेल्या मंगल कार्यालयांकडून पार्किंगची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. यावर तातडीने उपाय म्हणून मंगल कार्यालयांनी सशुल्क ट्रॅफिक वॉर्डन नेमणे बंधनकारक करावे, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील आणि पोलिसांवरील ताण कमी होईल. त्याचबरोबर प्रशासनानेही पर्यायी मार्ग तयार करून वाहतूक विभाजनाची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. मनीष काळभोर (उद्योजक, लोणी काळभोर, ता. हवेली)पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते आहे. यामागे कमी मनुष्यबळ, रस्त्यांवरील अतिक्रमणे व मंगल कार्यालयांची अपुरी पार्किंग व्यवस्था ही प्रमुख कारणे असल्याचे दिसत आहे. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी प्रयत्न होणे फार गरजेचे आहे, त्याअनुषंगाने लवकरच पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवून नागरिकांना दिलासा मिळेल. युवराज काकडे (सभापती, पंचायत समिती हवेली)फुरसुंगी फाट्यावर दोन विवाह सोहळ्यांमध्ये आलेल्या पाहुण्यांनी आडव्या-तिडव्या वाहनांची पार्किंग केल्याने परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तसेच कुंजीरवाडी येथे मंगळवारी आठवडे बाजार, नायगाव चौक बंद आणि महामार्गाच्या एका मार्गिकेजवळ गॅस कंपनीचे काम सुरू असल्याने या दोन्ही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीची माहिती मिळताच तात्काळ वाहतूक पोलिसांना घटनास्थळी पाठवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. संबंधित मंगल कार्यालय चालक व मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, लवकरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. राजेंद्र करणकोट (पोलीस निरीक्षक, हडपसर-लोणी काळभोर वाहतूक विभाग)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.