Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? 'या' मोठ्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात; शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण!"

"महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? 'या' मोठ्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात; शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण!"


विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचे शेवटचे चार दिवस शिल्लक असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं एका पक्षाला थेट विलिनीकरणाची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. विशेष म्हणजे या विलिनीकरणाच्या मोबदल्यामध्ये विधान परिषदेवर याच पक्षाच्या प्रमुख नेत्याला पाठवण्यास शिंदेंची शिवसेना तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असं जर झालं तर महाराष्ट्रातील एका पक्षाचं अस्तित्व पुसलं जाणार असून हा पक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलिन झाल्याचं पाहायला मिळेल. हा पक्ष कोणता हे गणित आहे काय? समजून घेऊयात सविस्तरपणे...

शिंदेंसोबत कधी झाली बैठक?

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ज्या नेत्याला पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्याची ऑफर दिली आहे त्या नेत्याचं नाव आहे बच्चू कडू! एकेकाळी लोकसभा निवडणुकांमध्ये नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी विरोध करत महायुती विरोधात भूमिका घेतली होती. त्याच बच्चू कडूंना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र विधानपरिषदेवर येण्यासाठी बच्चू कडू यांना त्यांचा 'प्रहार' पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागेल अशी अट बच्चू कडू यांच्या समोर शिवसेनेनं ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 19 एप्रिल रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात अर्धा तास बैठक झाली. यात विधान परिषद उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

याच नेत्याला ऑफर का दिली आहे?
विधान परिषदेशाठी शिंदेच्या शिवसेनेकडून पहिली पसंती म्हणून नीलम गोरे यांचं नाव जवळपास निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे. बच्चू कडूंना विधान परिषदेवर पाठवण्याआधी त्यांच्यासमोर शिवसेनेनं फारच मोठी अट ठेवली आहे. तुम्ही तुमचा 'प्रहार' पक्ष शिवसेनेमध्ये विलीन केला तरच विधान परिषदेवर संधी देणार, असं शिवसेनेकडून बच्चू कडूंना कळवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. अमरावती विभागात शिवसेनेला जनआंदोलने उभी करणारा प्रभावी नेता हवा आहे. बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनांचा (कर्जमाफी) प्रभाव पाहता ही ऑफर दिली गेली.
भाजपाचा विरोध?

दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडू यांना दिलेल्या या ऑफरमुळे अमरावतीसह मुंबईत खळबळ उडाली आहे. भाजपकडून या साऱ्यामध्ये अडथळे येत असल्याचे सांगितले जात आहे. कडूंवर आरोप, गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.

सध्या तरी सावध भूमिका
बच्चू कडू यांना पत्रकारांनी या ऑफरबद्दल विचारलं असता त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं. "कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईन," असं बच्चू कडू म्हणाले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी असतानाही बच्चू कडू यांनी कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर केला नाही.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

बच्चू कडू अद्याप प्रहार पक्ष विलीन करण्याबाबत विचार करत आहेत का अशी चर्चा आता अमरावतीच्या राजकीय वर्तुळात आहे. बच्चू कडू स्वतंत्र राहून आंदोलनांसंदर्भातील काम सुरु ठेवत शिवसेनेत सामील होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ही ऑफर स्वीकारली तर बच्चू कडू पुन्हा आमदार (एमएलसी) होतील आणि 'प्रहार'चा आवाज थेट विधान परिषदेत पोहोचेल. आता बच्चू कडू यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजकीय ताकद किती?
शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग कल्याण, विधवा पेन्शन यांसाठी बच्चू कडू यांनी अनेक अभिनव आंदोलने जमिनीत गाडून अर्धदफन, अन्नत्याग, पदयात्रा यासारख्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला आहे. मागच्या वर्षी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत मोठे शेतकरी आंदोलन उभे केले. यामध्ये त्यांनी हजारो शेतकऱ्यांना एकत्र करून सरकारला कर्जमाफी समिती आणि पॅकेजची घोषणा करायला भाग पाडले.शिक्षक, अपंग, शेतकरी यांच्या प्रश्नावर सातत्याने बच्चू कडू आक्रमक भूमिका घेताना दिसतात. वेळेप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलनं करतात. त्यामुळेच सत्ताधारी-विपक्ष दोघेही त्यांना गांभीर्याने घेतात. म्हणूनच बच्चू कडू शिवसेनेची ऑफर स्वीकारुन विधान परिषदेवर गेले तर शिंदेंच्या शिवसेनेला अमरावतीमध्ये आणि विदर्भामध्ये एक भक्कम चेहरा मिळेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.