सध्या खाजगी शाळांमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींसाठी पैसे आकारले जात असल्याने सर्वसामान्य पालक आधीच मेटाकुटीला आले आहेत. त्यातच गणवेशापासून ते अगदी वह्या-पुस्तकांपर्यंत सर्वच गोष्टी शाळेतूनच घेण्याचा आग्रह शाळा प्रशासनाकडून धरला जात असल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशातच उत्तर प्रदेशातील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिकेचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. पालकांनी वह्या बाहेरून खरेदी केल्याच्या रागातून मुख्याध्यापिकेने त्यांच्यासोबत अर्वाच्य भाषेत गैरवर्तन केले.
हरदोई येथील एका शाळेच्या मुख्याध्यापिका ममता मिश्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्या एका विद्यार्थिनीच्या आईवर जोरात ओरडताना आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलताना दिसत आहेत. "यांच्या मुलाचे नाव आत्ताच्या आत्ता रजिस्टरमधून काढून टाका, चालते व्हा इथून, शट अप, गेट लॉस्ट" अशा शब्दांत त्यांनी पालकांचा अपमान केला. फक्त सीनिअर केजी मध्ये शिकणाऱ्या चिमुकल्याचे नाव काढण्याची धमकी त्यांनी दिली.
वह्या-पुस्तकांमध्ये कमिशनचा खेळ?
विद्यार्थिनीची आई नीलम वर्मा यांनी आपल्या पाल्यासाठी लागणाऱ्या वह्या आणि पुस्तके बाहेरून खरेदी केली होती. मात्र, शाळेने या वह्या वापरण्यास नकार दिला. शाळेचा आग्रह होता की पालकांनी सर्व शैक्षणिक साहित्य शाळेतूनच घ्यावे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी गेलेल्या नीलम वर्मा यांना मुख्याध्यापिकेच्या संतापाला सामोरे जावे लागले. शाळा व्यवस्थापन स्वतःच्या फायद्यासाठी विशिष्ट दुकानांतूनच साहित्य खरेदीची सक्ती करत असल्याचा आरोप आता पालकांकडून होत आहे.
"मला बदनाम करण्याचा कट"; मुख्याध्यापिकेचा दावा
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्याध्यापिका ममता मिश्रा यांनी आपली बाजू मांडली आहे. "व्हिडिओमध्ये माझी भाषा चुकीची वाटू शकते, पण त्यामागील सत्य वेगळे आहे. संबंधित पालक गेल्या अनेक दिवसांपासून शुल्कावरून त्रास देत होते. शाळेत लसीकरणाचा कार्यक्रम सुरू असताना त्यांनी जाणूनबुजून गोंधळ घातला," असं त्यांनी म्हटले. मात्र, व्हिडिओमधील त्यांच्या वागण्यावरुन लोक त्यांच्या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
प्रशासनाकडून चौकशीचे आदेश
या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी घेतली आहे. "शिक्षकांची भाषा ही संयमित आणि मर्यादित असायला हवी, पालकांशी असे वर्तन करणे ही आपली संस्कृती नाही," अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या शाळेला केवळ पहिली ते पाचवीपर्यंतचीच मान्यता असल्याची माहिती समोर आली असून, त्याखालील वर्ग बेकायदेशीरपणे सुरू आहेत का, याचीही चौकशी आता सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.